For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अरेबैल घाटातील अपघात नाही....घातपात!

06:16 AM Apr 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
अरेबैल घाटातील अपघात नाही    घातपात
Advertisement

. भा. प्रतिनिधी

Advertisement

कारवार

गेल्या 8 तारखेला हुबळी-अंकोला हमरस्ता क्रमांक 52 वरील अरेबैल घाटातील तळीकुंब्री बसस्थानकाजवळील एका ख•dयात फोक्सवॅगन कंपनीची कार जळालेल्या अवस्थेत आढळली होती. केए 04 एमजी 8986 असा कारचा क्रमांक आहे. कारमध्ये अज्ञात व्यक्तीचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. सदर घटना 8 एप्रिल रोजी पहाटे 5 ते 7 च्या दरम्यान घडली आहे. घटनेनंतर घटनास्थळी दाखल झालेल्या यल्लापूर पोलिसांनी अपघाती प्रकरण समजून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेहाची तपासणी केली असता हा घातपाताचा प्रकार तर नाही ना? असा संशय बळावल्याने पोलिसांनी त्या दिशेने तपासाची चक्रे फिरविण्यास सुरुवात केली. काही आठवड्यापूर्वी होन्नावर तालुक्यातील सुळमर्की येथेही अशाच प्रकारची घटना घडली होती. त्या घटनेत कार चालकाचा जळून मृत्यू झाला होता. तथापि होन्नावर पोलिसांनी त्या प्रकरणाची कसून चौकशी केली असता तो घातपाताचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्या प्रकरणी आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

Advertisement

अरेबैल घाटातील प्रकरणी यल्लापूर पोलिसांनी पहिल्यांदा मयत अज्ञात व्यक्तीचा शोध लावण्याचा प्रयत्न केला आणि ती व्यक्ती बेळगाव तालुक्यातील कणबर्गी येथील नितीन जगब्राय धापळे (वय 35) असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर यल्लापूर पोलिसांनी जगन्नाथ धापळे यांच्याशी संपर्क साधला असता आपल्या पुत्राचा अपघात नव्हे तर घातपात झाला आहे, अशी तक्रार नोंदविली.

प्रकरणाचा छडा लावण्यासाठी दोन पथके

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून प्रकरणाचा छडा लावण्यासाठी दोन पोलीस पथकांची नियुक्ती केली होती. सीसीटीव्ही फुटेज व विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ओल्ड हुबळी येथील तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांची नावे अब्दुल नहीम बसीर अहमद मुजावर (रा. हेग्गेरी), मौलासाब बाबाजान बाड (रा. दविडगी ओणी) आणि दादापीर ऊर्फ अफ्ताब मेहमुबसाब बाळसगी (रा. गार्डन पेठे) अशी आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून एक बोलेरे कार, होंडा अॅक्टीव्हा आणि अन्य एक दुचाकी जप्त केली आहे.

खून हुबळीत

संशयित आरोपींनी तो खून ओल्ड हुबळीत केला आणि मृतदेहासह कार हुबळी-अंकोला राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 52 वरील अरेबैल घाटातील तळीकुब्री येथील बसस्थानकाजवळच्या ख•dयात जाळली, असे सांगण्यात आले. हे प्रकरण पूर्ववैमनस्यातून घडले असावे, असे सांगण्यात येत असले तरी प्रकरणा पाठीमागील नेमके कारण समजू शकले नाही.

कारवार जिल्हा पोलीसप्रमुख दीपन एम., अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख कृष्णमूर्ती, शिरसीच्या डीवायएसपी गीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईचे नेतृत्व यल्लापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रमेश हनापूर यांच्या नेतृत्वाखाली झाले. या कारवाईत पीएसआय राजशेखर वंदली, कर्मचारी सिद्धप्पा गुडी सहभागी झाले होते. आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यल्लापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

‘तरुण भारत’च्या वृत्तातून संशय व्यक्त

कार आणि कारचालक जळाल्याची बातमी ‘तरुण भारत’च्या 9 एप्रिलच्या अंकात प्रसिद्ध झाली होती. बातमीत हा अपघात की घातपात आहे, याबद्दल संशय व्यक्त करण्यात आला होता.

Advertisement
Tags :

.