कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये अचूक निर्णय घेण्याची क्षमता
प्रेरणा परिषदेला पालक - विद्यार्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; कुडाळदेशकर गौड ब्राह्मण सहयोगचा कार्यक्रम
कुडाळ -
एआय किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता हा जडजंजाळ शब्द नाही.पण लोक उगाचच बाऊ करतात.मेंदू ज्या गोष्टी करू शकतो त्या गोष्टी संगणक सहजपणे करू शकत नाही. त्याला आज्ञावली द्यावी लागते, तरच तो काम करतो. संगणकापेक्षा कृत्रिम बुद्धिमत्ता ( एआय) चा वापर भविष्यात आपल्याला जास्त अचूक निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त करून देईल.याचे कारण आपल्याला पडणाऱ्या शक्य त्या प्रश्नांची माहिती त्यात साठवलेली असते,असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते, लेखक आणि एआय तज्ञ चिन्मय गवाणकर यांनी कुडाळ येथे प्रेरणा परिषदेत केले. कुडाळदेशकर गौड ब्राह्मण सहयोग ( डोंबिवली ) व कुडाळदेशस्थ गौड ब्राह्मण विद्यावृद्धी समाज ( मुंबई ) यांच्या संयुक्त विद्यमाने येथील मराठा समाज सभागृहात प्रेरणा परिषद 2025 तसेच विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या प्रेरणा परिषदेला पालक व विद्यार्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली.त्यानंतर अर्चिता अनंत सामंत हिने नृत्य आविष्कारातून गणेश वंदना सादर केली. यावर्षी या प्रेरणा परिषदेचे १२ वे विचार पुष्प प्रमुख मार्गदर्शक चिन्मय गवाणकर यांनी गुंफले. त्यांनी कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा? या विषयी मार्गदर्शन करताना अनेक टिप्स दिल्या. सतत अभ्यास केल्यास आकलन होण्यापेक्षा विस्मरण होण्याची शक्यता वाढते, असे त्यांनी सांगून इंजिनिअरिंग, मेडिकल हे उच्चशिक्षण घेताना मोठ -मोठी पुस्तके एकट्याने अभ्यासण्यापेक्षा, विद्यार्थी मित्रांचा गट केला आणि विषय विभागून अभ्यास केला, तर तो अभ्यास करणे कसे सोपे होते ? याबाबत त्यांनी विद्यार्थांना टीप्स दिल्या.दुसऱ्या टप्प्यात त्यांनी कृत्रिम बुद्धीमत्ता म्हणजे नक्की काय? हे स्पष्ट केले. एआयला योग्य माहिती दिली तरच तो आपल्याला अपेक्षित असा सगळ्यात योग्य किंवा अचूक मार्ग सांगतो किंवा उत्तर देतो ,असे त्यांनी सांगून अनेक व्यावहारिक उदाहरणे दिली. शिक्षणतज्ञ रामभाऊ परूळेकर आणि मुख्याध्यापक कै. बाबूराव परूळेकर पुरस्कार मालवण एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह विजय कामत यांना श्री. गवाणकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.कामगार नेते डॉ. कै.दत्ता सामंत पुरस्कार डोंबिवली येथील पहिले सिए ,लेखा परीक्षक डी.ए.पाटकर याना देण्यात आला. श्री कामत म्हणाले, टोपीवाला शैक्षणिक संस्थेत कार्यवाह म्हणून काम करण्याची संधी आपल्याला गुरूस्थानी असणाऱ्या सामंत सरांमुळे मिळाली. या सन्मानासाठी आपल्याला निवडल्याबद्दल त्यांनी कुडाळदेशकर गौड ब्राह्मण सहयोग संस्थेचे आभार मानले.कुडाळदेशकर गौड ब्राह्मण ज्ञातीतील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहावी व बारावी परीक्षेतील उत्तीर्ण 54 गुणवंत विद्यार्थी तसेच पदवीप्राप्त आठ विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.मालवणचे बाळासाहेब पंत वालावलकर , फोंडाघाटचे सुरेश सामंत, पाटचे डि.ए.सामंत, प्रा.राजेंद्र ठाकूर ( उत्तुर ) ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत सामंत ( परुळे ), डॉ.प्रशांत सामंत, (परूळे ) , सहयोग कार्यवाह भिकाजी वालावलकर, उपाध्यक्ष विनय तिरोडकर व बाबुराव वालावलकर तसेच सेवानिवृत्त मुख्याध्यापिका स्वाती वालावलकर ( कुडाळ ) या मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थांचा गौरव करण्यात आला. ''अनाम प्रेम'' या संस्थेशी जोडलेल्या आणि दिव्यांग क्षेत्रामध्ये काम करीत असलेल्या अपुर्वा अमित सामंत हिचाही सत्कार करण्यात आला. विनय तिरोडकर यांनी पाहुण्यांचे स्वागत तसेच शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे सभासद संजय सामंत ( झाराप ) व उद्योजिका शैलजा ( शैला ) सामंत ( कुडाळ ) यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. प्रेरणा परिषद आणि सत्कार समारंभाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सहयोगचे मंगेश कोचरेकर यांनी केले,तर पुरस्काराचे मानकरी श्री कामत यांचा परिचय व विद्यार्थी गौरव सोहळ्याचे सूत्रसंचालन कुडाळचे सहायक गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी केले.पूर्वा नाईक ,तृप्ती प्रभुदेसाई ,साक्षी ठाकूर , बाबू वालावलकर, संजय ठाकूर , राजेंद्र देसाई,प्रथमेश नाईक ,शिल्पा सामंत , विजय परुळेकर , महेश राळकर , मनोज प्रभदेसाई ,चंद्रकांत ठाकूर, वल्लभ सामंत , शामू देसाई यांच्यासह सहयोग संस्थेचे अन्य सदस्य उपस्थित होते.