विद्यार्थ्यांनी राजदूत बनून विद्यापीठाची प्रतिमा उंचवली पाहिजे
अखिल भारतीय तंत्रज्ञान परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. एस. एस. मंथा यांचे प्रतिपादन
कोल्हापूर प्रतिनिधी
विद्यापीठांनी उद्योजकतेला प्रोत्साहन देणारे वातावरण जोपासले पाहिजे. इनक्यूबेटर, फंडिंगची सोय आणि मेंटोरशीपच्या कार्यक्रमाचा समावेश केला पाहिजे. स्टार्टअप पूर्ण करणारे विद्यार्थी व्यवहारिक कौशल्याच्या विकासाला चालना देतात. त्यामुळे पदवीधर विद्यार्थ्यांनी कौशल्य आणि अभ्यासाच्या जोरावर राजदूत बनून विद्यापीठाची प्रतिमा उंचवली पाहिजे, असे प्रतिपादन अखिल भारतीय तंत्रज्ञान परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. एस. एस. मंथा प्रमुख यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाचा 60 वा दीक्षांत समारंभ राजमाता जिजाऊ साहेब सभागृहात पार पडला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते. दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मंथा बोलत होते. कुलगुरूंच्या हस्ते साईसिमरन घाशी यांना राष्ट्रपती सुवर्णपदक तर बिल्कीस गवंडी यांना कुलपती सुवर्णपदक प्रदान केली. 40 पीएच. डी. व विविध अधिविभागातील 16 गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देवून गौरवण्यात आले. प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी अहवाल वाचनात नॅक मूल्यांकन, एनआयआर मानांकनासह विद्यापीठाची यशस्वी घोडदौड कशी वाढत गेली याचा आढावा घेतला. यंदा 49 हजार 438 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वाटप केल्याचे सांगितले. दीक्षांत समारंभाचे लाईव्ह प्रक्षेपण सुरू असल्याने शेकडो विद्यार्थ्यांनी ऑनलाईन हजेरी लावली.
डॉ. मंथा म्हणाले, आयुष्यातील प्रत्येक गोष्ट विश्वास आणि समर्पणाच्या भावनेने केली पाहिजे. कारण विविध विषयावर काम करणाऱ्या विद्यार्थ्यांनी एकत्र येवून क्रांतीकारी कल्पनांचा उदय होतो. त्यामुळे मोठे ध्येय गाठण्यासाठी विविध दृष्टीकोन स्विकारत प्रगतीचे शिखर गाठले पाहिजे. तसेच यश आणि अपयश पचवण्याची ताकद असेल तर आयुष्याचा प्रवास सुखकर होतो. विद्यापीठाची स्वत:ची शक्तीस्थळ आणि विशिष्ट दृष्टीकोन असतो. शैक्षणिक उत्कृष्टता, संशोधन, नाविन्य आणि प्रतिभावान विद्यार्थी विद्यापीठ मजबूत करतात. विद्यापीठांची उद्योग क्षेत्राशी भागीदारीही फायदेशीर ठरते. विद्यापीठात प्रमाणपत्र घेतले तरी तुमच्या ज्ञानाचा फायदा समाजाला करून दिला पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्या कतृत्वाने विद्यापीठाचा लौकिक वाढवला पाहिजे.
अध्यक्षस्थानावरून कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी विविध प्रकारची कौशल्य प्राप्त करावी. शैक्षणिक प्रवास पूर्ण करताना अनेकांना संघर्ष करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपण मिळवलेल्या ज्ञानाचा समाजाच्या प्रगतीसाठी उपयोग केला पाहिजे. तरच विद्यार्थी ज्ञानी व शहाणे होतील. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी पदवी प्रमाणपत्रांचा आढावा घेतला. कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. अधिसभा सदस्य धैर्यशील यादव व नंदिनी पाटील यांनी यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती, उच्च व तंत्र शिक्षण कोल्हापूर विभागीय सहाय्यक शिक्षण सहसंचालक डॉ. अशोक उबाळे, अधिकार मंडळाचे सदस्य डॉ. व्ही. एम. पाटील, डॉ. शेजवळ, डॉ. एम. एस. ठाकूर, डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. निशा पवार, डॉ. रघुनाथ ढमकले, किसनराव कुऱ्हाडे, दलितमित्र व्यंकाप्पा भोसले आदी उपस्थित होते.
सेवानिवृत्त पोलीस उपअधिक्षक आर. आर. पाटील यांनी घेतली कायद्याची पदवी