For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

2027 चा वनडे वर्ल्डकप रंगणार आफ्रिका खंडात

06:20 AM Apr 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
2027 चा वनडे वर्ल्डकप रंगणार आफ्रिका खंडात
Advertisement

द. आफ्रिकेसह झिम्बाब्वे, नामिबियाला यजमानपदाचा बहुमान

Advertisement

वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग

आयसीसी विश्वचषक 2027 चे आयोजन दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या तीन देशांद्वारे केले जाणार आहे. ही स्पर्धा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये खेळवली जाईल. विश्वचषकाच्या इतिहासात दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे आयसीसी विश्वचषकाचे यजमानपद भूषवण्याची ही दुसरी वेळ असेल. यापूर्वी 2003 मध्येही या दोन्ही देशांनी यजमानपद भूषवले होते. यंदा मात्र नामिबिया या छोट्या देशालाही यजमानपदाची संधी मिळाली आहे, हे विशेष. या वर्ल्डकपसाठी आफ्रिकेतील आठ मैदानांची निश्चिती करण्यात आली आहे.

Advertisement

बुधवारी आयसीसीने याबाबतची माहिती देताना सांगितले की, 2027 या वर्षात द.आफ्रिका, झिम्बाब्वे व नामिबिया या तीन देशात आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धा होणार आहे. यासाठी आफ्रिकेतील आठ मैदानांची निश्चिती करण्यात आली आहेत. या स्पर्धेतील सामने जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियम, प्रिटोरियातील सेंच्युरियन पार्क, डर्बनच्या किंग्समीड, सेंट जॉर्ज, सुपरस्पोर्ट पार्क, न्यूलँड्स स्टेडियम, बफेलो पार्क आणि द मांगुआंग ओव्हल स्टेडियमवर रंगणार आहेत. दरम्यान, क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे सीईओ मोसेकी म्हणाले, हा निर्णय हॉटेल रुम्स आणि एअरपोर्टची सुविधा हे सर्व पाहता घेण्यात आला आहे. आमच्याकडे आयसीसीचे मान्यताप्राप्त 11 स्टेडियम्स आहेत. त्यामुळे उर्वरित 3 स्टेडियम्सकडे दुर्लक्ष करणं कठिण होतं. मात्र हा निर्णय अनेक बाबींचा विचार करुन घेण्यात आला आहे.

आफ्रिका खंडात दुसऱ्यांदा वर्ल्डकप

आफ्रिका खंडात विश्वचषक खेळवण्याची ही दुसरी वेळ असेल. यापूर्वी 2003 मध्ये क्रिकेट विश्वचषक आफ्रिकेत आयोजित करण्यात आला होता. यावेळी केनिया, दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेसह यांनी मिळून या स्पर्धेचे आयोजन केले होते. 2027 मध्ये मात्र विश्वचषकाचे यजमानपद दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियाकडे आहे. यजमान असल्याने दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे सरळ स्पर्धेत खेळतील. परंतु नामिबियासोबत असे होणार नाही. पुढील काही वर्षांतील कामगिरीच्या जोरावर त्यांना वर्ल्डकपमध्ये आपले स्थान निर्माण करावे लागणार आहे. नामिबियाचा विश्वचषक प्रवेशाचा फॉर्म्युला इतर संघांप्रमाणेच राहील.

स्पर्धेत 14 संघांचा सहभाग

वर्ल्डकप 2027 मध्ये 14 संघ सहभागी होणार आहेत. यापैकी 2 संघ आधीच ठरलेले आहेत. यानंतर, आयसीसी वनडे क्रमवारीतील अव्वल 8 संघांना विश्वचषकाचे थेट तिकिट मिळेल. उर्वरित 4 संघ क्वालिफायर सामन्यांद्वारे वर्ल्डकपसाठी पात्र ठरतील. वर्ल्डकप 2027 मध्ये प्रत्येकी 7 संघांचे दोन गट असतील.  ग्रुपमधील राऊंड रॉबिन टप्प्यानंतर दोन्ही गटातील शीर्ष 3 संघ पुढील फेरीत जातील. म्हणजेच दुसऱ्या फेरीत 6 संघ असतील. यानंतर एका गटाचा संघ दुसऱ्या गटातील सर्व संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळेल. अशा प्रकारे या फेरीत प्रत्येक संघाचे 3 सामने होतील. या टप्प्यात 2 संघ बाहेर पडतील आणि त्यानंतर उपांत्य फेरीचा सामना खेळवला जाईल.

Advertisement

.