एकोणिसावे गुंफण सद्भावना साहित्य संमेलन वाशीत होणार
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र माने यांची संमेलनाध्यक्षपदी निवड : गुंफण अकादमी आणि वाशीच्या श्रीराम ज्ञानपीठतर्फे आयोजन : अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे यांची माहिती
कोल्हापूर प्रतिनिधी
वाशी (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथे 23 व 24 डिसेंबर रोजी होत असलेल्या एकोणिसाव्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र माने यांची निवड करण्यात आली आहे. गुंफण अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी ही माहिती दिली. गुंफण अकादमी (मसूर, ता. कराड, जि. सातारा) व श्रीराम ज्ञानपीठ (वाशी) यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या एकोणिसाव्या गुंफण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. माने यांची निवड करण्याचा निर्णय अकादमीच्या बैठकीत सर्वांनी एकमताने घेतल्याचे डॉ. चेणगे यांनी सांगितले.
डॉ. राजेंद्र माने यांच्या धाकटा वाडा, वहिनीसाहेब, पळणारी क्षितिजे, प्रिय, चिरेबंदी, मन तुझं माझं, प्रवाहातील नौका, रत्ना आणि प्रतारणा, अंधाराच्या सावल्या, सुन्या सुन्या मैफिलीत आदी कादंब्रया त्याचप्रमाणे मुखवट्यामागचे चेहरे, गुंता आणि गोफ, न लिहलेली आत्मकथा, व्यथापर्व, जगण्याने छळले होते, जिगोलो आणि इतर कथा, सांजसावल्या आदी कथासंग्रह विशेष गाजले आहेत.
याशिवाय वळणावरची माणसं हा व्यक्तीचित्र संग्रह, मनातलं, लोकसंस्कृतीचा गाभारा, मन गाभारा हे लेखसंग्रह तसेच जाणिवांच्या प्रदेशात हा काव्यसंग्रह अशी विपुल साहित्य संपदा प्रकाशित आहे. अनेक वर्तमानपत्रांमध्ये स्तंभलेखन तसेच आकाशवाणीसाठी त्यांनी प्रदीर्घकाळ लेखन केले आहे. त्यांच्या अनेक साहित्यकृतींना साहित्य परिषदेचा शि. म. परांजपे पुरस्कार, स्मिता पाटील साहित्य पुरस्कार, दक्षिण महाराष्ट्र साहित्य पुरस्कार, कादंबरीकार ना. ह. आपटे पुरस्कार, लोकमत उत्कृष्ट कथा संग्रह पुरस्कार स्वातंत्र्यसैनिक दादासाहेब उंडाळकर स्मृती पुरस्कार यासारखे अनेक पुरस्कार लाभले आहेत. त्यांच्या मी गुलाबबाई या एकांकिकेचे सादरीकरण तर न्यूजर्सी येथे झालेल्या विश्वनाट्या संमेलनात झाले होते. साहित्य क्षेत्रात चौफेर कामगिरी केलेल्या डॉ. माने यांच्या अध्यक्षतेखाली गुंफणचे हे संमेलन साजरे होत आहे असे डॉ. चेणगे यांनी सांगितले.