तेचि भूत गे माये
सध्या गाजत असलेल्या ‘संगीत देवबाभळी‘चे प्रयोग महाराष्ट्रभर सुरू आहेत. एवढंच नव्हे तर परदेशातही भरारी घेण्यासाठी ती टीम तयार असल्याची चर्चा सुरू आहे. त्या नाटकाने संगीत नाटकांच्या दुनियेत काहीतरी वेगळंच घडवून आणलंय. कारण संगीत नाटक म्हटलं की एकदम आपल्या डोळ्यासमोर संगीत सौभद्र, संगीत शाकुंतल, संगीत स्वयंवर यासारखी दणदणीत आणि धडाकेबाज नाटकं उभी राहतात. नाट्यासंगीत आणि नाटक यांनी उभ्या महाराष्ट्राला खूप काही दिलंय. आपल्याकडची ती शंभर सव्वाशे वर्षाहूनही अधिक जुनी परंपरा आहे.
त्यामुळे संगीत नाटक म्हटलं की कुतूहल, उत्सुकता वाटणे अगदी साहजिक आहे. परंतु संगीत हेही सतत बदलत असतं. त्याचप्रमाणे संगीत नाटक हा प्रकार जरी आजही तितक्याच उत्साहाने पाहिला आणि केला जात असला तरी काळाप्रमाणे आणि बदलत्या ट्रेंड्स प्रमाणे त्यातही बदल घडून आलेले आहेत. आणि ते अपेक्षितच आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये जेव्हा सतत छोटे छोटे बदल होत जातात त्याचवेळेला तिच्यातला ताजेपणा कायम राहत असतो. आणि त्यातला ताजेपणा राहिला तर सौंदर्य टिकत राहतं. साचलेपणा नसेल तर ते प्रवाही राहतं. आणि कोणत्याही पिढीतल्या माणसाला ते आवर्जून बघावसं वाटतं. या नियमाला संगीत रंगभूमी नक्कीच अपवाद नाहीये. संगीत देवबाभळी सारखा प्रकार हा त्यातलाच एक! खरं तर संगीत नाटकांच्या संगीत दिग्दर्शनात ट्रेंड सेटर म्हणून जर नाव घ्यायचं झालं तर ते आपल्याला अभिषेकी बुवांचं नाव घ्यावं लागेल. कारण त्यांनी खूपच अभिनव पद्धत सुरू केली. उदाहरणार्थ भैरवीपासून संगीत नाटकाची सुरुवात करणे हा एक अत्यंत वेगळा प्रयोग ‘संगीत कट्यार काळजात घुसली’च्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. आजही आपण गाण्याच्या कोणत्याही कार्यक्रमाची भैरवीने सुरुवात करणं याची साधी कल्पनाही करू शकत नाही. मग त्यांनी इतक्या पन्नास साठ वर्षांपूर्वीच्या काळात थेट संगीत नाटकाची सुरुवात भैरवीने करणं हे केवढं मोठं वेगळेपण आहे! आणि हा करायचा म्हणून केलेला प्रयोग नव्हता तर हा प्रयोग हा जाणूनबुजून, विचाराने आणि संगीत रंगभूमीला एक चांगली दिशा देण्यासाठी केला गेलेला होता. आणि तो करणारी व्यक्तीही संगीतातली तितकीच अधिकारी व्यक्ती होती.
आता ‘पंढरीचे भूत मोठे‘ या ओळीचा या सगळ्याशी संबंधच काय? असा आपल्याला प्रश्न पडेल. तर कलाकार मंडळी ही स्वत:ला भूत म्हणवून घेतात. आणि त्या सगळ्यांचं म्हणणं असं असतं की हे भूत एकदा चढलं की आयुष्यभर ते आपल्या डोक्यावर सवार राहतं. कलेचं भूत ज्याच्या डोक्यावर सवार आहे असा कलाकार पुढचा जन्मही कलाकाराचाच मागतो. इतकं हे भूत प्रभावी असतं. अगदी मानगुटीलाच बसतं म्हणा ना! आता ‘पंढरीचे भूत मोठे‘ या ओळी खरं तर तुकाराम महाराजांच्या. त्यात त्यांनी आपल्याला लागलेला विठ्ठलाचा नाद किती तीव्र आहे आणि किती घट्ट आहे हे दाखवण्यासाठी अभंगात हे शब्द वापरले. कारण असं, की एखाद्याला भूत लागलं की ते सहसा त्याला सोडतच नाही अशी आपल्याकडे समजूत असते. आणि आपल्याला लागलेली ओढ किंवा आपलं असलेलं ईश्वरावरच प्रेम याची तीव्रता दाखवायला अगदी रामदास स्वामींनी सुद्धा या भूत नावाच्या उपमेचा वापर केलेला आहे. वेड चाळल्यासारखं करणाऱ्या नारायणाला बघून त्याची आई त्याला विचारते की अरे नारायणा, तुला काय भूतबाधा झाली म्हणायची की काय? त्यावर छोटा नारायण उत्तर देतो. होय मला भूतबाधा झाली आहे खरी. पण ते भूत कोणतं आहे ते माहित आहे का तुला आई? आणि ते उद्गार म्हणजे रामदास स्वामींच्या अभंगातल्या ह्या ओळी,
होते वैंकुंठीचे कोनी । शिरले अयोध्याभुवनी ।
लागे कौसल्येचे स्तनी। तेचि भूत गे माये ?
सर्वां भूतांचे हृदय । नाम त्याचे रामराय ।
रामदास नित्य गाय । तेचि भूत गे माये
तीच उपमा तुकाराम महाराजांनी वापरली. त्यात ते म्हणतात ...
तेथे जाऊ नका कोणी।गेले नाही आले परतोनी।
पंढरीचे भूत मोठे।आल्यागेल्या झडपी वाटे?
कारण पंढरीचं भूत हे काही सर्वसामान्य भूत नव्हे. साक्षात महाविष्णूंचा अवतार! म्हणजे खुद्द महादेव जे भूतनाथ आहेत, तेच ज्याला भजतात असं हे महाभूत आहे.
या शब्दाचे अर्थ होतात दोन. भूत म्हणजे सर्व जीव. माणसापासून ते पशुपक्षी किडामुंगीपर्यंतच्या सर्व जीवांना भूतमात्र असं म्हटलेलं आहे. म्हणून आपली ज्ञानेश्वर माऊली सुद्धा ‘भूतां परस्परे जडो मैत्र जीवांचे’ असं दान परमेश्वराकडे मागते. ज्यांचा मृत्यू घडला आहे पण ज्यांना गती मिळाली नाही असे आत्मे भूत म्हणून अशरीरी होऊन पृथ्वीवरच वास करून राहतात अशी पुरातन धारण आहे. काहींना फार वेगळे अनुभव आयुष्यात येतात. त्यामुळे त्या त्या धारणेवरचा विश्वास पक्का झालेला असतो. या लोकधारणेप्रमाणे भूत या शब्दाचा अर्थ आहे परंतु मुळात भूत हा शब्द फार जुना आहे. आणि तो शब्द जीवमात्र याच संकल्पनेतून आलेला असावा हे निश्चित आहे. मग तो अशा वेगळ्याच मितीत वावरणाऱ्या जीवांना जाऊन कसा व का चिकटला हे एक मोठं कोडं आहे. पण आत्ताच्या काळात तरी भूत म्हटलं की आपण मेलेल्या माणसांचे फिरणारे आत्मे असाच अर्थ घेतो.
आता जाता जाता हे की संगीत नाटकातला वेगळा प्रयोग म्हणजे काय? तर या नाटकातली गाणी म्हणजे अभंगच आहेत. परंतु पारंपरिक नाट्यासंगीतापेक्षा यांचं गायन फार वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. ज्या पद्धतीने लोकगीतं गातात, ओव्या गातात त्या पद्धतीने घरादारात वावरणाऱ्या या दोन सर्वसामान्य वाटणाऱ्या, परंतु असामान्य असणाऱ्या बायकांनी हे अभंग वेळोवेळी गायलेत म्हणून ते वेगळेपण आहे. त्यातला सर्वात जास्त प्रसिद्ध पावलेला अभंग किंवा रचना म्हणजे ‘पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे!’ लखुबाई उर्फ रखुमाई व आवली म्हणजेच जिजाई या दोघीजणी भाकऱ्या थापताना, धुणं धुताना, पाणी आणताना, भांडी घासताना, कपड्यांच्या घड्या करताना आणि घरातली जी काय असतील ती कामं करताना सहज गुणगुणल्यासारखी ही सगळी गाणी गातात. दणदणीत बाज व सणसणीत तानांचे सट्टे या नाट्या संगीताच्या आजवरच्या इतिहासाला बराच मोठा धक्का देणारं हे संगीत आहे. अर्थात त्याच्यामध्येही आनंदगंधर्व अर्थात आनंद भाटे यांच्या आवाजात रेकॉर्ड केलेले काही अभंगही वापरलेले आहेत. परंतु मूळ भर या दोघींच्या गाण्यावरच आहे. आणि त्या गाण्यातून त्यांना काय म्हणायचं आहे त्याची जिवंत चित्रं त्या दोघी उभी करतात. नाट्यासंगीताचं संगीत हे कसं असावं याची चौकट असू शकत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे.
बरेच वर्षे चाललेल्या परंपरांनी चौकटी बनतात. हे जरी खरं असलं तरी एखाद्या मूर्तीवर शेंदराचे लेपाटे बसावेत आणि मूळ आकार दडावा तसं हे आहे. कधीतरी ते शेंदुराचं कवच निखळून पडतं आणि आतली मूळ रेखीव मूर्ती दिसते. तसं परंपरांचे लेपाट्यावर लेपाटे चढत गेल्यामुळे नाट्यासंगीत हे नक्की कशासाठी असतं हा मुद्दा काळाच्या ओघात त्याच्याआड दडत गेला. कधीतरी हा कवचभंग होतो आणि नाट्यासंगीताचं रेखीव सौंदर्य नजरेस येतं. ती अनुभूती म्हणजेच अशा वेगळ्या वाटेने जाणारी संगीत नाटकं! आणि असे अभिनव प्रयोग करून पाहणारी माणसं कलेचं न उतरणार भूत सवार असल्याशिवाय हे काम करू शकत नाहीत. म्हणून पंढरीचं भूत जसं संतांवर गारुड करून गेलं होतं तसं हे नादब्रह्माचं भूत कलाकारांवर कायमच गारुड करत असतं हे निश्चित आहे.
अॅड. अपर्णा परांजपे प्रभु