Satara News | 'त्या' डॉक्टर तरुणीची आत्महत्याच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
फलटण प्रकरणात फॉरेन्सिकचा निष्कर्ष स्पष्ट; आत्महत्येची पुष्टी
सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीचा मृत्यू गळा दाबून झालेला नाही. तिने गळफास घेतल्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचे फॉ रेन्सिक रिपोर्टमधून निष्पन्न झाल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ते विधानसभेतील चर्चेदरम्यान बोलत होते.
भाजपचे आमदार अमित साटम यांनी प्रश्नोत्तराच्या तासात फलटणच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टर महिलेने केलेल्या आत्महत्या प्रकरणी प्रश्न विचारला होता. यावर फडणवीस यांनी राज्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.
अक्षर तिचेच
ऑक्टोबरमध्ये या महिला डॉक्टरने फलटणमधील हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. मृत्यूपूर्वी तिने तळहातावर सुसाईड नोट लिहिली होती. त्या नोटमध्ये तिने प्रशांत किसन बनकर आणि फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक गोपाल बदने यांची नावे नमूद केली होती. या दोघांवरही तिने छळ, अत्याचार आणि फसवणुकीचे गंभीर आरोप केले होते. ते म्हणाले, अहवालानुसार तिच्या हातावर लिहिलेलं अक्षर तिचंच आहे. लग्नाचं आमिष दाखवून तिचं शोषण करण्यात आले. दुसऱ्या आरोपीने फसवणूक केल्याचे समोर आले आहे. तपासात तिचा मृत्यू गळफास घेऊन झाल्याची पुष्टीही झाली आहे.