घोंघावते जे अर्णब...
अर्णब चक्रीवादळाने आंध्र किनारपट्टीला दिलेला तडाखा अभूतपूर्वच म्हणावा लागेल. या वादळामुळे आंध्र किनारपट्टी परिसरातील जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले असून, जीवितहानी झाल्याचेही दिसून येते. आंध्र, ओडिशासह अन्य राज्यांवर देखील या चक्रीवादळाचे सावट असल्याने अर्णबचे आव्हान महाकायच असेल. चक्रीवादळे हा निसर्गचक्राचाच एक भाग मानला जातो. किंबहुना, एल निनो वर्षात अधिक तीव्रतेची चक्रीवादळे निर्माण होण्याकरिता अनुकूल स्थिती असते. अर्णबचा रुद्रावतार पाहता याची प्रचिती येते. एल निनो वर्षांत उत्तर हिंद महासागरात तयार होणारी चक्रीवादळे विषुवृत्ताच्या जवळ निर्माण होण्याची चिन्हे असतात. त्यामुळे त्यांचा प्रवास ओडिशा, पश्चिम बंगालऐवजी आंध्र व तामिळनाडू किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकण्याची अधिक शक्यता असते, असे भारतीय हवामान विभागाचे प्रमुख मृत्युंजय महापात्र यांनी यापूर्वीच म्हटले होते. त्यानुसारच अर्णब चक्रीवादळाची वाटचाल सुरू दिसते. खरे तर याआधी म्हणजेच 2014 या एल निनो वर्षांतही ‘हुदहुद’ चक्रीवादळाने आंध्र किनारपट्टीवर हाहाकार उडवला होता. आताही अर्णबची तीव्रता, त्याच्यात चढत्या क्रमाने झालेली वाढ, जमिनीच्या दिशेने वेगाने होणारा प्रवास अशा गोष्टी एकत्रितपणे पहायला मिळाल्या आहेत. ताशी सव्वाशे किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे आंध्रमध्ये मोठी उलथापालथ पहायला मिळते. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे रस्तेही वाहून गेले असून, झाडे वा विजेचे खांब अक्षरश उन्मळून पडले आहेत. काही भागात पूलही वाहून गेल्याची उदाहरणे आहेत. बचाव कार्याअंतर्गत जवळपास 60 ते 70 हजार नागरिकांना मदत छावण्यांमध्ये हलविण्यात आले आहे. घरांची पडझड, आठ जणांचा झालेला मृत्यू पाहता चक्रीवादळाने आंध्रचे कंबरडेच मोडल्याचे दिसून येते. आत्तापर्यंत राज्यात करोडो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. स्वाभाविकच या तडाख्यातून सावरण्याकरिता आंध्रप्रदेशला मदतीचा हात द्यावा लागेल. ओडिशावरही या वादळाचे मळभ दाटल्याने लाखो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. अर्णबचा वेग पाहता ओडिशासह इतर राज्यांनाही निश्चितपणे सावध रहावे लागेल. झारखंडमध्ये चक्रीवादळ व पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय योग्यच म्हणता येईल. काही रेल्वे गाड्याही बंद ठेवण्यात आल्या असून, लोकांनाही अशा परिस्थितीत प्रवास करणे टाळायला हवे. काही भागांत अतिवृष्टीचाही इशारा आहे. विशेषत: अतिवृष्टीमुळे डोंगराळ भागात दरड कोसळण्याच्या घटना घडतात. हे लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घेणे क्रमप्राप्त ठरते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार बिहार, छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश या राज्यांनाही या वादळाची झळ बसण्याची शक्यता आहे. याशिवाय दिल्ली एनआरसी, पंजाब, हरियाणाच्या काही भागातही वादळी पाऊस वा गारपिटीचा धोका संभवतो. या सगळ्या शक्याशक्यता लक्षात घेऊन आवश्यक ती काळजी घ्यावी लागेल. भारतासारख्या देशात चक्रीवादळे नवीन नाहीत. आजवर अनेक वादळांना आपण सामोरे गेलो आहोत. हा अनुभव लक्षात घेऊन अधिकची हानी कशी टाळता येईल आणि नागरिकांचा जीव कसा वाचवता येईल, यावर सरकार, प्रशासनासह सर्व यंत्रणांनी भर द्यावा. मुळात किनारपट्टीवरून वादळ जमिनीच्या दिशेने आले, की त्याचे परिणाम आणखी भयंकर असू शकतात. अतिवृष्टी, पुरासोबत अनेक आपत्ती त्यातून निर्माण होण्याची भीती असते. हे ध्यानात घेऊन सगळ्या यंत्रणांना तैनात ठेवावे लागेल. यंदा महाराष्ट्रासह काही राज्ये तीव्र दुष्काळाचा सामना करत आहेत. अर्णबच्या प्रभावामुळे महाराष्ट्रावर पावसाचे सावट असले, तरी वातावरणाच्या वरच्या थरात पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांनी चक्रीवादळाचा मार्ग रोखल्याचे दिसून आले. त्यामुळे पावसाचा जोर हा प्रामुख्याने पूर्व किनारपट्टीपुरता दिसून आला. दुसरीकडे दक्षिण अंदमानच्या समुद्रात चक्रीय स्थिती निर्माण झाली असून, कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचा अंदाज आहे. त्यातूनही एक नवे चक्रीवादळ निर्माण होऊ शकते, असा कयास आहे. हवामानाच्या या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवावे लागेल. आत्तापर्यंत अर्णबने आपले उपद्रवमूल्य मोठ्या प्रमाणात दाखवून दिले आहे. वादळाला कह्यात ठेवणे आपल्या हातात नसले, तरी योग्य उपाययोजना मोठे नुकसान नक्कीच टाळू शकतील.
