ज्याचा कधीही नाश होत नाही त्याला ब्रह्म म्हणतात
अध्याय आठवा
अर्जुनाने भगवंतांना विनंती केली की, हे पुरुषोत्तमा, मला ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव, अधि-यज्ञ म्हणजे काय? आणि येथून प्रयाण करताना लोक तुम्हाला कसे ओळखतात? हे सविस्तर उलगडून सांगा.
भगवंत अर्जुनाच्या प्रश्नांची उत्तरे देऊ लागले. अर्जुनाचे श्रीकृष्णावर अमर्याद प्रेम असल्याने, तो काय विचारेल हे आधीच ओळखून त्याबाबतची माहिती भगवंत लगेच देत होते. स्तनपान करणाऱ्या ताह्या बाळाची भूक आईला बरोबर समजते. त्यामुळे त्याला बोलायला येत नसले तरी बिघडत नाही. त्याप्रमाणे शिष्याचा मनातले विचार सद्गुरु जाणतात आणि त्याने न मागता त्याला हवे ते देतात. भगवंतांनी अर्जुनाच्या प्रश्नाचे उत्तर पुढील श्लोकापासून द्यायला सुरवात केली. ते म्हणाले, ब्रम्ह अक्षर ते थोर अध्यात्म निज-भाव जो । भूत-सृष्टि घडे सारी तो जो व्यापार कर्म ते ।।3 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली सांगतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, ज्याचा कधीही नाश होत नाही त्याला ब्रह्म म्हणतात. ते अत्यंत सूक्ष्म असते. त्याला उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या तिन्ही अवस्था नसतात. हे अध्यात्माच्या माध्यमातून प्रत्ययाला येते. ब्रह्मापासून भूतमात्रादी चराचर पदार्थांची उत्पत्ती करणारा जो सृष्टिव्यापार चालतो त्याला कर्म म्हणतात. शुद्ध व निराकार अशा ब्रह्मातून ब्रह्मांडाचे निरनिराळे आकार उत्पन्न व्हायला लागतात. त्या एकेका ब्रह्मांडामध्ये निर्माण होणाऱ्या जीवांची संख्या अगणित असते.
पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, हे नरश्रेष्ठा, अधिभूत म्हणजे नश्वर वस्तु, जीव म्हणजे अधिदैवत आणि जीवाची मी म्हणजे हा देह ही गैरसमजूत नष्ट करणारा, अधियज्ञ म्हणजे मीच होय.
अधि-भूत विनाशी जे जीवत्व अधि-दैवत । अधि-यज्ञ असे मी चि ह्या देही यज्ञ-पूत जो ।।4 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, अधिभूत विनाशी असल्याने त्याचे अस्तित्व ढगाप्रमाणे वरवरचे असते. त्याला पंचमहाभूतांमुळे तात्पुरता देहाचा आकार मिळतो. भगवंतांनी मांडलेल्या विश्वाच्या प्रपंचातील सर्व सजीव व निर्जीव वस्तू ह्या अधिभूत होत. त्या पंचमहाभूतापासून तयार झालेल्या असतात आणि त्यांचे नष्ट होणे निश्चित असते.
अधिदैव म्हणजे त्या वस्तूतील आत्मा होय. कोणतीही देह पंचमहाभुतांपासून तयार होत असल्याने त्रिगुणात्मक असतो म्हणून त्यातील आत्माही त्रिगुणांनी वेढलेला असल्याने त्याला जीव असे म्हणतात. तो देहाचा मालक असतो. तो चैतन्यपूर्ण असून त्याच्याकडून देहाला हालचाल करण्याची ताकद मिळते. तो ब्रह्माचा अंश असतो पण हा देह म्हणजेच मी ह्या गैरसमजुतीतून तो सुखदु:खाचे भोग भोगतो. स्वप्नवत असलेल्या जगाच्या अनुकूल व्यवहाराने तो संतोष पावतो व प्रतिकूल गोष्टीतून दु:खी होतो. त्याला पंचभूतात्मक शरीररूपी घरातील अधिदैव समजावे. अधिदैवाची किंवा जीवात्म्याची मी म्हणजे हे शरीर ही गैरसमजूत दूर करण्याचे काम मी करतो.
क्रमश: