गेमिंग अॅपच्या प्रसाराचा माझा तो व्हिडीओ बनावट : सचिन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने सोमवारी त्याचा एक व्हिडिओ ‘बनावट’ असल्याचे स्पष्ट करत फेटाळून लावला आहे. त्यामध्ये तो सहज पैसे मिळवून देण्याची मोहिनी घालणाऱ्या एका गेमिंग अॅप्लिकेशनचा प्रचार करताना दिसतो. तेंडुलकर त्यात अॅपच्या फायद्यांबद्दल बोलत असल्याचे दाखविण्यात आले आहे. पैसे कमावणे इतके सोपे झाले आहे हे आपल्याला माहीत नव्हते आणि आपली मुलगी देखील हा प्लॅटफॉर्म वापरते असे सचिन त्यात सांगताना दिसतो.
क्रिकेटच्या खेळातील सर्वकालीन सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या सचिनने एका संदेशासह सदर व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्याने तंत्रज्ञानाच्या गैरवापराबद्दल चिंता व्यक्त केली आहे. हा व्हिडीओ बनावट आहे. तंत्रज्ञानाचा असा सर्रासपणे होणारा गैरवापर पाहणे हे अस्वस्थ करणारे आहे. अशा प्रकारचे व्हिडीओ, जाहिराती आणि अॅप्ससंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी कराव्यात ही प्रत्येकाला विनंती आहे, असे 50 वर्षीय तेंडुलकरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट केले आहे. सदर व्हिडीओमध्ये वापरलेला आवाजही तेंडुलकरच्या आवाजाशी जुळतो.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी सतर्क राहण्याची आणि तक्रारींना प्रतिसाद देण्याची गरज आहे. चुकीची माहिती आणि ‘डीपफेक’चा प्रसार रोखण्यासाठी त्यांच्याकडून त्वरित कृती होणे महत्त्वपूर्ण आहे, असे सचिनने पुढे लिहिले आहे. अभिनेता टॉम हँक्स आणि रश्मिका मंदाना यांचा अलीकडच्या काळात ‘डीपफेक्स’ला बळी पडलेल्या प्रसिद्ध व्यक्तींमध्ये समावेश होतो.
सरकारकडून लवकरच कठोर नियम
दरम्यान, केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी तेंडुलकरच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना सरकारकडून माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत कठोर नियम लवकरच अधिसूचित केले जाणार आहेत, असे नमूद केले आहे. ‘सचिन या ट्विटसाठी धन्यवाद. ‘एआय’च्या (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आधाराने ‘डीपफेक’ आणि चुकीची माहिती पसरविणे हा भारतीय वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेला आणि विश्वासाला धोका आहे. हे कायद्याचे उल्लंघन असून प्लॅटफॉर्म्सनी ते रोखायला हवे आणि काढून टाकायला हवे’, असेही चंद्रशेखर यांनी म्हटले आहे.