Karad News : कराडमध्ये मुजावर कॉलनीत मुजावर कॉलनीत वाघाचा 'तो' व्हीडिओ खोटा
कराडमध्ये वाघ वावराची अफवा
कराड : कराड शहरातील मुजावर कॉलनी परिसरात वाघाचा वावर असल्याचा खोटा व्हीडिओ कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तयार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. सदर अफवा सोशल मीडियावर, विशेषतः व्हॉट्सअॅपद्वारे मोठ्या प्रमाणावर पसरवून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याबाबतची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुजावर कॉलनी येथे जात तपास केला असता हा एआय तंत्रज्ञानाव्दारे सदरचा व्हीडिओ तयार केल्याचे समोर आले आहे.
ओमकार खंडू बोबाटे (रा. मुजावर कॉलनी, कराड) याच्याकडून हा बनावट व्हीडिओ प्रसारित झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर वनविभागाने तत्काळ याची दखल घेतली. प्राप्त मोबाईल संदेशांच्या आधारे संबंधित ठिकाणी वनविभागाच्या पथकाने प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र कोणत्याही ठिकाणी वाघाचा वावर आढळून आला नाही. तसेच परिसरातील कोणत्याही नागरिकाने वाघ प्रत्यक्षपाहिल्याचा पुरावा समोर आलेला नाही. यामुळे हा व्हीडिओ एआय तंत्रज्ञानाचा आधार घेऊन बनवण्यात आल्याचे स्पष्ट झाले,
दरम्यान, नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या संशयास्पद व्हीडिओ किंवा संदेशांची खातरजमा केल्याशिवाय ते पुढे पाठवू नयेत, असे आवाहन कराडच्या वनक्षेत्रपाल ललिता पाटील यांनी केले आहे. सदरच्या व्हीडिओची तांत्रिक तपासणी करण्यासाठी तो कराड सायबर क्राईम विभागाकडे पाठवला असून, पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.
ही कार्यवाही उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहाय्यक वनसंरक्षक जयश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल ललिता पाटील, वनपाल आनंद जगताप, वनरक्षक अक्षय पाटील, अभिजीत शेळके तसेच आरआरटी टीमचे अजय महाडिक व रोहित कुलकर्णी यांनी केली.