भगवंतांची विशेष उपस्थिती असते त्या गोष्टीला त्यांची विभूती असे म्हणतात
भगवंत म्हणाले, प्रत्येक वस्तुत एक वैशिष्ठ्या असते. त्या वस्तूत असलेल्या माझ्या उपस्थितीमुळेच त्या पदार्थाला ते वैशिष्ठ्या प्राप्त झालेले असते. उदाहरणार्थ पाण्यामध्ये ओलावा किंवा वाऱ्यामध्ये स्पर्श अथवा चंद्र-सूर्यामधील तेज, पृथ्वीच्या ठिकाणी असणारा शुद्ध वास, आकाशाच्या ठिकाणी असणारा शब्द, वेदातील ओंकार, मनुष्याच्या ठिकाणी असलेला पराक्रम, अग्नीमधील तेज, प्राणिमात्रांचे जीवन आणि तपस्व्यांचे तप मी आहे. अग्नीतील तेज मी आहे. सर्व वस्तूंच्या ठिकाणी असलेले आत्मतत्व मीच आहे. बुद्धिमानांची बुद्धि, तेजस्व्यांचे तेज मी आहे. तपस्वी लोकांचे ठिकाणी तप ही माझी विभूती आहे असे समज.
पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, राग आणि द्वेष ह्या दोन्ही गोष्टी ज्यांच्या ठिकाणी नसतात अशा बलवानांचे बल मी आहे. हे भरतश्रेष्ठा, भूतांचे ठिकाणी धर्माला अनुसरून असलेला जो काम तो मी आहे.
वैराग्य-युक्त निष्काम बळवंतांत मी
बळ । राहे धरूनि धर्मास ती मी भूतांत वासना ।।11 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, बलवान लोकांमध्ये जे अढळ बल आहे, ती माझीच विभूती आहे व बुद्धिवानांच्या ठिकाणी जी बुद्धी असते तीही माझीच विभूती आहे. ज्या इच्छांमुळे धर्माचा उत्कर्ष होतो, त्या चांगल्या इच्छा माझ्यामुळेच निर्माण होतात. त्या जगाचे कल्याण व्हावे म्हणून केलेल्या असतात. त्या धर्माला धरून आणि नियमांना अनुसरून असतात. त्यामुळे सृष्टीची वाढ होते, विश्व समाधानी होते. अशा इच्छामुळे वेदांनी गौरव केलेल्या कर्माचे आचरण मोक्षप्राप्ती होईपर्यंत होत राहते. सर्व जग माझ्यापासून उत्पन्न झाले आहे त्यामुळे प्रत्येकात माझे अस्तित्व असते असे सांगितल्यावर पुढे भगवंतांनी प्रत्येक वस्तुत, प्राणीमात्रात जे वैशिष्ठ्या आहे ते माझ्या उपस्थितीमुळे आहे असे सांगितले. प्रत्येक प्राणीमात्राचा स्वभाव वेगवेगळा असतो कारण तो त्याच्यातील त्रिगुणातील कोणत्यातरी एका गुणाच्या प्रभावामुळे असतो, ते स्वभाव भगवंतांपासूनच निर्माण झालेले आहेत.
पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, सात्विक, राजस, तामस, म्हणून जे भाव आहेत ते सर्व माझ्यापासून उत्पन्न झालेले आहेत असे जाण. ते माझ्यामध्ये आहेत पण मी त्यांच्यामध्ये नाही.
माझ्यातूनि तिन्ही झाले सात्त्विकादिक भाव ते । परी त्यांत न मी राहे ते चि माझ्यांत राहती ।। 12 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी असे सांगितले की, सत्व, रज, तम ह्या गुणांपासून झालेले भाव माझ्या स्वरूपापासून उत्पन्न झाले आहेत परंतु या भावात मी नसतो.
जागे असताना मनुष्य ज्या गोष्टीचे चिंतन करत असतो तीच गोष्ट त्याला स्वप्नात दिसते परंतु तो स्वप्नात ज्या गोष्टी करतो त्या जागेपणी त्याच्या आयुष्यात घडत नाहीत अथवा ज्याप्रमाणे भरीव बी म्हणजे गोठलेला रसच असतो. त्या बि ला रुजवले की, त्याचेच लाकुड बनते पण त्या लाकडाचे ठिकाणी बीपणा नसतो त्याप्रमाणे माणसाच्या विकारांना मी कारणीभूत असलो तरी त्या विकारात मी नसतो.
क्रमश: