लाच घेणारा ‘तो’ मंत्री बहुदा पणजीतीलच असावा : उत्पल
उत्पल पर्रीकर यांचा होरा, नाव न घेता लगावला टोला
पणजी : माजी मंत्री पांडुरंग मडकईकरांकडून 20 लाख ऊपयांची लाच घेणारा तो मंत्री बहुदा पणजीतीलच असावा, असा होरा माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे सुपूत्र उत्पल पर्रीकर यांनी लावला आहे. या आरोपामुळे सरकारचेही चारित्र्य डागाळले असून ते धुवून निघण्यासाठी ‘तो’ मंत्री कोण याचा शोध लागणे अत्यंत आवश्यक असल्याचे पर्रीकर यांनी म्हटले आहे. दुसऱ्या बाजूने मडकईकरांनीही अशाप्रकारे मोघम विधान केल्याबद्दल उत्पल यांनी नाराजी वर्तविली आहे. खरे तर एवढा गंभीर आरोप करताना त्यांनी स्वत:जवळ कोणताही पुरावा असल्यास तो उघड केला पाहिजे व त्यानंतर सरकारने त्यातील सत्यता तपासून कारवाई करायला हवी, असे उत्पल यांनी पुढे म्हटले आहे.
प्राप्त माहितीनुसार ‘त्या’ मंत्र्याच्या कारभारात त्याच्या पीएचा हस्तक्षेप मर्यादेपेक्षा जरा जास्तच होत आहे. सर्व सुत्रे तोच हाताळत असल्याने हा मुद्दा यापूर्वी मुख्यमंत्र्यांपर्यंतही पोहोचला होता. त्यानंतर त्यांच्याच आदेशानुसार त्या मंत्र्याने पीएला बाजूलाही केले होते. परंतु तो ‘दुरावा’ औट घटकेचाच ठरला व पीए पुन्हा एकदा नव्या जोमाने कारभारात हस्तक्षेप करू लागला आहे. हे सर्व पाहता मडकईकरांनी पेलेल्या आरोपात कदाचित ‘तो’ पीए ही असू शकतो. कारण मामलाच संशयास्पद आहे, अशी माहिती उत्पल यांनी दिली.
डबल इंजिन सरकारसाठी तो एक ‘ब्रेक’
सदर मंत्र्याबद्दल यापूर्वीही बोलताना आपण, डबल इंजिन सरकारमध्ये तो मंत्री म्हणजे एक ‘ब्रेक’ असल्याची टीका केली होती.अशा या मंत्र्याची कार्यपद्धती व सध्या त्याच्या भोवती दिसणारे संशयाचे वलय पाहता मडकईकर प्रकरणातील ‘तो’ मंत्री दुसरा तिसरा कुणीही नसून ‘तोच’ असावा याबद्दल आपली खात्री आहे, असेही पर्रीकर यांनी विश्वासपूर्वक सांगितले. असे असले तरी मडकईकर यांनीच खरे खोटे काय असेल ते जाहीर करावे, असेही पर्रीकर म्हणाले.