'त्या' बापाला १४ दिवस न्यायालयीन कोठडी
आटपाडी :
शाळेतील नीटच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मुलीचा बळी घेणाऱ्या शिक्षक वडील धोंडीराम भगवान भोसले याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. घटनेचा गुन्हा दाखल होताच तात्काळ अटक करण्यात आलेल्या मयत मुलीच्या वडीलाची पोलीस कोठडी संपल्याने मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले.
नेलकरंजी येथील साधना धोंडीराम भोसले (१७) या मुलीला शिक्षक असलेले वडील धोंडीराम भोसले यांनी शुक्रवारी रात्री घरी जात्याच्या लाकडी खुट्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीने शनिवारी मुलीचा मृत्यु झाला. या खुनप्रकरणी पत्नी प्रिती भोसले यांच्या फिर्यादीवरून धोंडीराम भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करून पोलीसांनी अटक केली. त्यानंतर त्यांना न्यायालयाकडून मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
लेकीचा जीव घेणाऱ्या शिक्षक असलेल्या वडीलाच्या कृतीने संपुर्ण राज्यातून शोक आणि संताप व्यक्त होत आहे. या घटनेने शिक्षण व्यवस्था, मुलांवरील अभ्यासाचे प्रेशर, खोटी प्रतिष्ठा, मुलांपेक्षा गुणांना दिले जाणारे अनाठायी महत्त्व आदी गोष्टी चर्चेत आल्या. समाज माध्यमातून या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत असतानाच 'त्या' पित्याचाही जागोजागी निषेध होत आहे.
या सर्व घडामोडी घडत असतानाच मंगळवारी मुलीच्या हत्येतील संशयित आरोपी धोंडीराम भोसले याला आटपाडी पोलीसांनी न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायाधीशांनी त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे त्याची रवानगी पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विनय बहीर यांनी दिली. दरम्यान, मुलीच्या कॉलेजमधील सराव टेस्टमध्ये कमी गुणांमुळे खुनाच्या घटनेने नेलकरंजीसह आटपाडी तालुका राज्यात नकारार्थ कृतीने चर्चेत आला आहे.