काला मांडिला वो
जगामधली कुठलीही आई असो, तिचे मन हे एकसारखेच असते. मग ती कालची, आजची, उद्याचीही असेल. तिला जर तुम्ही एक प्रश्न विचारला, तर त्याचे उत्तर ‘एकच’ मिळेल. तिला कोणी विचारले, तुझे जास्त प्रेम तुझ्या कोणत्या मुलावर आहे? तर ती फक्त हसून असे म्हणेल, आईच्या प्रेमामध्ये बेरीज, वजाबाकीसारखे गणित नसते, तर वात्सल्याने ओसंडून जाणारे ह्रदय असते. या हृदयाला डावे-उजवे असे काही नसून दोन्ही सारखेच असते. पंढरपुरी विटेवर दोन्ही हात कमरेवर ठेवून समचरण असलेली आमची विठूमाउली, विठाई नेमके हेच आम्हाला सांगते. विठूमाउलीकडे येणारे संत, भक्त सगळे समान आहेत. सर्व जाती, उपजाती पंथ-धर्म यांना आपलेपणाने अंगाखांद्यावर नाचवणारा लेकुरवाळा विठोबा महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. विठुरायाच्या अंगणात त्याच्या लेकरांचा मेळा जमला आणि ते खेळू-नाचू लागले की पृथ्वीमातेला सुद्धा आनंदाचे भरते येते. तिचा आनंद बघून तिचा भाऊ पाऊसमामा धावून येतो आणि आनंद अधिकच द्विगुणित करतो. तिची कन्या चंद्रभागा लहरीलहरींनी आनंद व्यक्त करते.
संत जनाबाई विठोबाला लेकुरवाळा म्हणतात. लेकुरवाळा या शब्दाचा अर्थ मुलेबाळे असलेला असा आहे. खरे म्हणजे लेकुरवाळा हा शब्द समाजामध्ये फारसा प्रचलित नाही. स्त्रियांना लेकुरवाळी असे मात्र म्हटले जाते, कारण या शब्दाला सूक्ष्म अशी अर्थच्छटा आहे. लेकुरवाळी स्त्राr मऊ-मवाळ असते. सक्षम तरीही हळवी असते. माया, काळजी, भविष्याची स्वप्ने तिच्या डोळ्यात वस्तीला असतात. तिच्याजवळ तारतम्य असते आणि संघटनकौशल्य सुद्धा. चातुर्याने व खेळकरपणाने ती कुटुंबाला जोडून ठेवते. भावंडांमध्ये नाजूक रेशीमबंधांची कोरीव नक्षी काढते. मुख्य म्हणजे जगण्यापेक्षा जगवण्याची तिची इच्छा प्रबळ असते. म्हणूनच की काय प्रेमाने खाऊ घालणे हा तिचा सहजधर्म असतो. ती साक्षात अन्नपूर्णा असते. हे गुण पुरुषांमध्ये फारसे दिसत नाहीत म्हणून असेल कदाचित. ‘लेकुरवाळा’ हा शब्द क्वचितच वापरला जातो. मात्र आमच्या विटेवरल्या विठूरायामध्ये हे सारे गुण सामावले आहेत. ते त्याचे प्रधान वैशिष्ट्या आहे. ते म्हणजे सर्व लेकरांना एकत्र बसवून जेवू घालणे. मुलाबाळांमध्ये कोणताही भेदभाव न करता त्यांच्यासह भोजन करणे विठुरायाला फारच आवडते. नामसप्ताह, भागवत सप्ताह, गाथापारायण, कीर्तनसप्ताह असे कोणतेही अनुष्ठान हे काल्याच्या कीर्तनाशिवाय संपन्न होत नाही. गोपाळकाला हा भक्तांचा अतिशय आवडता प्रसाद आहे. ‘हरिचा काला गोड झाला, ज्याच्या नशिबी त्यास मिळाला’, असे म्हणतात. कारण काला या पदार्थाचा जनक कोण तर प्रत्यक्ष विठुराया आहे.
गोकुळात असताना आपल्या सवंगड्यांबरोबर तो वनात गायी चरायला घेऊन जातो. गायी चरायला लागल्या की गोपाळांसह सवंगडी यमुनेच्या काठी खेळ खेळतात. वयानुसार थोडीफार मारामारी, चिडवाचिडवी, पळापळी झाली की मग खूप जोरदार भूक लागते आणि ते श्रीकृष्णाबरोबर पंगत धरून एकत्र जेवायला बसतात. नंतर काय सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र होतात आणि काला तयार होतो. संत जनाबाईंचा सुंदर अभंग आहे. असो थोराथोरांची मात। तूचि मिळालासी गोपाळात? त्यांच्या शिदोऱ्या सोडिसी । ग्रासोग्रासी उच्छिष्ट खासी । न म्हणे सोवळे ओवळे । प्रत्यक्षचि ते सोवळे? स्वानंदाचे डोही हात । धुतले सर्वाही निश्चित? हाती काठ्या पायी जोडे । दासी जनी वाट झाडे ?
सर्वांच्या जाड्याभरड्या शिदोऱ्या हा श्रीकृष्ण एकत्र करतो. त्यात दही कालवतो आणि आपल्या हातांनी गोपाळांना भरवतो. भरीस भर म्हणजे त्यांचे उष्टेही तो आनंदाने खातो. संत एकनाथ महाराज याचे बहारदार वर्णन करतात.
या गोपाळांच्या शिदोऱ्या असतात तरी कशा? आणिती शिदोऱ्या आपआपल्या । जशा जैशा हेत तैशा त्या चांगल्या । शिळ्याविटक्या भाकरी दहिभात लोणी । मेळवोनी मेळा करी चक्रपाणी । हा कान्हा गरीब-श्रीमंत, जातपात असा भेदभाव न करता सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून काला करतो. सर्वांना वाढतो. सर्वांच्या मुखात घास घालतो तेव्हा त्याचे सवंगडी म्हणतात, तू पण जेव ना कन्हैया. तर तो म्हणतो, तुम्ही आधी घ्या नंतर मी जेवीन. मुलांचे पोट भरल्यावरच आई जेवेल ना? संत एकनाथ महाराज म्हणतात, हा पांडुरंग कसा आहे? विष पिणे धावून जाणे । भाविकाची भाजी खाणे। कण्याची तो आवडी मोठी । एका जनार्दनी लाळ घोटी। पुढे ते एका अभंगात म्हणतात, कण्या खाये विदुराच्या। उच्छिष्ट गोवळ्याचे परमप्रिय । उच्छिष्ट फळे भिल्लीणीची । खाये रुची आदरे । पोहे खावे सुदाम्याचे । कोरडे फाके मारी साचे । असा हा पांडुरंग. तो एकदा आषाढी एकादशीचे पारणे सोडायला चोखोबांच्या घरी गेला. त्याच्यासोबत रिद्धीसिद्धीही गेल्या. मग पंगतीचा थाट तो काय वर्णावा. त्या दिवशी चोखोबाच्या घरी इंद्रादी देव विठोबाला भेटायला आले. या सर्वांना घेऊन विठोबा एकत्र जेवला.
संत एकनाथ महाराज म्हणतात, बैसल्या पंगती चोखियाच्या अंगणी । जेवी शारंगपाणी आनंदाने । नामदेवासहित अवघे गण गंधर्व । इंद्रादिक देव नारद मुनी । चोखामेळा म्हणे दोन्ही जोडोनिया कर । मज दुर्बळा पवित्र केले तुम्ही। पुढे महाराज म्हणतात, ढोरे वोढी त्याचे घरी। नीच काम सर्व करी । त्याचे घरी देव जेवला.
संत तुकाराम महाराजांनी काल्याचे आध्यात्मिक रूपकच रचले आहे. ते म्हणतात, गोपाळ म्हणाले, आपण काला करू. कृष्ण म्हणाला, कोणाची कोणती अधिकाररूपी शिदोरी आहे ती मला आधी बघू द्या. प्रत्येकाच्या कर्माच्या शिदोऱ्या उघडून कृष्णांनी प्रबोधन केले. ते ऐकून गोपाळ म्हणाले, कृष्णा आता आम्हाला ज्ञानरूपी प्रसाद वाटून दे. तुका म्हणे आता कान्होबा आम्हा वाटूनी द्यावे । आहे नाही आम्हापाशी ते सर्व तुज अवघे ठावे ।
कर्म तसे फळ या उक्तीनुसार जगताना कर्माची शिदोरी कशी असावी हे ठरवणे माणसाच्या हातात आहे. चांगले कर्म भविष्य आणि जन्म यांची आनंदी वाट निर्माण करते, तर वाईट कर्म माणसाला कुठे कसे भिरकावून देईल हे सांगता येणे कठीण आहे. सत्संगाचे श्रवण, मनन, नामस्मरण मनाला सात्विकता देते. त्यामुळे मन माझे माझेचे गाठोडे दूर फेकून देते आणि देवासान्निध्य जाण्याची शिदोरी जवळ बाळगून देवाकडे जाणाऱ्या वाटेवर चालू लागते. संत एकनाथ महाराज म्हणतात, गायी वनात चरून आल्या की त्यांना कदंब वृक्षातळी बसवून कृष्ण सवंगड्यांसह चेंडूफळी खेळत असे आणि मग ‘काला मांडीला वो काला मांडीला वो, नवलक्ष मिळवूनी काला मांडीला वो’. महाराज नवलक्ष असे म्हणतात. आकाशात नवलक्ष तारे आहेत अशी गणना आहे. गोपाळकृष्ण तिथे पंगती बसवतो. बोबडा पेंद्या वाढायला घेतो. ज्याचा जसा संकल्प तसे त्याला फळ मिळते. महाराज पुढे म्हणतात, पूर्वसंचित खाली पत्रावळी। वाढती भक्तिभावाची पुरणपोळी । नामस्मरणाची क्षुधा पोटी आगळी । तेणे तृप्ती होय सहज सकळी। असा आगळावेगळा अलौकिक काला श्रीकृष्ण करतो. त्यामुळे मी तूपण लयाला जाते आणि सर्वांच्या मुखांतून शुद्ध समाधिबोध तेवढा वर्णिला जातो. काला म्हणजे सहभोजन. युगानुयुगे हा धागा पांडुरंगाच्या भक्तांनी घट्ट धरून ठेवला आहे. आजही सर्व जातीधर्मपंथांचे लाखो वारकरी आनंदाने एकत्र बसून जेवतात. एकमेकांना खूप आनंदाने खास भरवतात. वाटसरूंना प्रेमळपणे ‘या जेवायला’ अशी हाक मारतात. एकत्र बसून केलेले हे भोजन त्या सर्वांना एक करते. लेकुरवाळ्या विठूने वाळवंटी ठायी मांडलेला हा खेळ म्हणजे गोपाळांच्या मेळ्याइतकाच गोपाळकाला आहे आणि त्याची गोडी अत्यंत अवीट आहे, हे ज्याला त्याला अनुभवल्यावरच कळते.
स्नेहा शिनखेडे