For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मानपाड्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची हत्या; एकाला अटक; गोळीबारासह धारदार शस्त्राने हल्ला; फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध

05:15 PM Sep 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
मानपाड्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची हत्या  एकाला अटक  गोळीबारासह धारदार शस्त्राने हल्ला  फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध
Advertisement

ठाणे : प्रतिनिधी : ठाण्यातील मानपाडा परिसरात शिवसेना ठाकरे गटाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांच्या कार्यालयात हा प्रकार घडला. हल्लेखोरांनी पूर्णेकर यांच्यावर गोळीबार करण्याबरोबरच धारदार शस्त्रानेही वार केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Advertisement

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, हल्ल्यात पूर्णेकर यांच्यावर पाच गोळ्या झाडण्यात आल्या. त्यापैकी दोन गोळ्या लागल्याने ते गंभीर जखमी झाले. याशिवाय त्यांच्या शरीरावर चाकू आणि चोपरने वार करण्यात आल्याचे समोर आले आहे. हल्ल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणात पप्या शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे. हल्ल्याच्या वेळी तो पूर्णेकर यांच्यासोबत कार्यालयात उपस्थित होता. हल्ल्यानंतर त्यानेच जखमी पूर्णेकर यांना रुग्णालयात नेल्याची माहिती तपासात समोर आली. मात्र, घटनाक्रम आणि त्याच्या हालचालींबाबत संशय निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली आणि त्यानंतर अटक केली.

Advertisement

पोलिसांच्या तपासानुसार, पप्या शिंदेने इतर संशयितांना पूर्णेकर यांच्या कार्यालयात आणल्याचा संशय आहे. त्यानंतर त्याने संकेत दिल्यानंतर दोन जणांनी गोळीबार केला, तर अन्य दोघांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. हल्ल्यानंतर चार जण घटनास्थळावरून पसार झाले.

या प्रकरणात एकूण पाच आरोपींचा सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यापैकी एकाला अटक करण्यात आली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. आणखी काही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे.

पप्या शिंदे आणि पूर्णेकर यांची पूर्वीपासून ओळख असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. काही महिन्यांपासून दोघांमध्ये संपर्क कमी झाला होता. मात्र, अलीकडील काही दिवसांत पुन्हा त्यांच्यात संपर्क असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. राजकीय तसेच वैयक्तिक वादाच्या दिशेनेही तपास केला जात आहे. फरार आरोपींच्या शोधासाठी गुन्हे शाखेसह पोलिसांची अनेक पथके रवाना करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
Tags :

.