ठाण्यात सभा घेतली म्हणून जरांगे- पाटील माझ्या विरोधात होत नाहीत- मुख्यमंत्री शिंदे
मराठा आरक्षणाचे काम युद्ध पातळीवर सुरु असून मराठा ओबीसी समाजाचे कोणत्याही प्रकारचे आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण देणार आहे असा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितले. तसेच मनोज जरांगे- पाटील सगळीकडे सभा घेत असून ठाण्यातील सभा आपल्या विरोधात नसल्याचाही त्यांनी दावा केला.
अचानक कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. माध्यमांशी बोलताना मुख्य़मंत्र्यांनी राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे...शेतकरी कष्टकरी समाधनी होऊ दे...सुख संपत्ती आरोग्य समाधान लाभू दे ! अशी प्रार्थना अंबाबाईला केली असल्याचे सांगितले.
जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयात धनगर आरक्षण समर्थकांनी फोडाफोडी केल्याच्या घटनेवर बोलताना ते म्हणाले घडलेल्या घटनेची माहिती घेतो.
ठाण्यात मनोज जरांगे- पाटील यांनी सभा घेऊन मुख्यमंत्र्यांवर आरोपावर बोलताना ते म्हणाले, "मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रात सगळीकडेच सभा घेत आहेत. मराठा बांधवांना भेटत आहेत. त्यांनी ठाण्यात सभा घेतली म्हणजे माझ्या विरोधात सभा घेतली असे होत नाही. मराठा आरक्षणाचे काम युद्धपातळीवर सुरु असून कोणत्याही समाजाचे ओबीसीचे आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण देऊ."असा दावा त्यांनी केला.
कोल्हापूरात चाललेल्या उस आंदोलनावर बोलताना त्यांनी ऊस आंदोलनाची माहिती घेतली असून सरकार हे बळीराजाचे आहे. त्यामुळे त्यांचे नुकसान न होण्याची काळजी घेऊ. खासदार धैर्यशील माने आणि संजय मंडलिक त्याचा पाठपुरावा करत आहेत. आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचे आवाहन केले.