ठळकवाडी, भातकांडे संघ विजयी
बेळगाव : बेळगाव स्पोर्ट्स क्लब आयोजित हनुमान चषक 16 वर्षांखालील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून ठळकवाडी संघाने सेंट झेवियर्सचा तर भातकांडे संघाने लव्हडेल संघाचा पराभव करुन प्रत्येकी 2 गुण मिळविले. प्रज्योत उघाडे, मोहम्मद हमजा यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आले. गोल्डन ज्युबिली मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात ठळकवाडी संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडी बाद 102 धावा जमविल्या. त्यात श्री हुंदरेने 3 चौकारांसह 23, प्रज्योत उघाडेने 20 धावा केल्या. सेंट झेवियर्सतर्फे विराट यळ्ळूरकरने 32 धावांत 3, इंद्रप्रजापत, यश, समर्थ व आरुश यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना सेंट झेवियर्स संघाने 20 षटकात 8 गडी बाद 74 धावा केल्या. त्यात प्रफुल्ल नाईकने 16 तर विराट येळ्ळूरकने 10 धावा केल्या. ठळकवाडीतर्फे प्रज्योत उघाडेने 4 धावांत 2 तर साईराम, ज्ञानेश्वर, निलेश्वर व मयूर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. दुसऱ्या सामन्यात लव्हडेल संघाने प्रथम फलंदाजी करताना 19.3 षटकात सर्वगडी बाद 87 धावा केल्या. त्यात अमोघ पाटीलने 4 चौकारांसह 36, तर साद बडगावीने 10 धावा केल्या. भातकांडेतर्फे मोहम्मद हमजाने 15 धावांत 4, नुमान दड्डीकर व सलमान धारवाडकर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना भातकांडेने 7 षटकात 2 गडी बाद 91 धावा करुन सामना 8 गड्यांनी जिंकला. त्यात सुमित भोसलेने 2 षटकार 6 चौकारांसह 45, मिहीर मिर्जीने 19 तर स्वयम मोरेने 18 धावा केल्या. लव्हडेलतर्फे विरेंद्र बुर्जी व निश्चल हिरेमठ यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले.