ठकसेन दीपश्री सावंत गावसला पुन्हा फोंडा पोलिसांचा पाहुणचार
फोंडा : बेरोजगारांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून कोट्यावधी रूपयांना गंडा घालणाऱ्या टोळीतील मुख्य सूत्रधार संशयित दीप़श्री सावंत गावस हिला सुनावलेल्या 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीतून फोंडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सावर्डे येथील सदानंद विर्नोडकर याने दाखल केलेल्या तक्रारीनुसार तिला फोंडा येथील प्रथम वर्ग न्यायालयात हजर केल्यानंतर 1 दिवसांच्या रिमांडवर तिची रवानगी फोंडा पोलिसांच्या कोठडीत केली आहे. ‘जॉब स्कॅम’ प्रकरणात माशेल येथील शिक्षण संस्थेत नोकरी देण्याचे सांगून रू. 10 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गजाआड केलेल्या आयआरबी पोलीस कॉन्स्टेबल सागर सुरेश नाईक व सुनिता पावस्कर यांना अटक केल्यानंतर दीपश्री सावंत गावस हिला फोंडा पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर माशेल येथील सरकारी अभियंता संदीप परब यांने आपण दीपश्रीला रू. 3.88 कोटी दिल्याची तक्रार दाखल केल्यानंतर तिच्या कोठडीत वाढ झाली होती. फोंडा पोलिसांनी तिच्याकडून 2 दुचाकी व 3 अलिशान एकत्रित सुमारे 40 लाख रूपये किमतीच्या वाहने जप्त करण्यात आलेली आहेत.