थायलंडची स्पर्धेत विजयी सलामी
हाँगकाँगचा 6 धावांनी पराभव : चेवाई सामनावीर
वृत्तसंस्था, दुबई
महिलांच्या आशिया चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील येथे खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात थायलंडने हाँगकाँगचा 6 धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली. थायलंड संघातील चेवाईला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
अ गटातील या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना थायलंडने 20 षटकात 9 बाद 120 धावा जमविल्या. त्यानंतर हाँगकाँगने 20 षटकात 7 बाद 114 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना थोडक्यात गमवावा लागला.
थायलंडच्या डावात कर्णधार चेवाईने 31 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 43, मायाने 1 चौकारासह 19, नेनापतने 2 चौकारांसह 27 धावा केल्या. हाँगकाँगतर्फे मारिना लॅम्पलोव्हने 11 धावांत 4 तर अॅलिसन सियूने 37 धावांत 3 तर चेनने 18 धावांत 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना हाँगकाँगच्या डावात कॅरी चेनने 20 चेंडूत 4 चौकारांसह 28, यास्मिन देसवाणीने 2 चौकारांसह 28, मारीना लॅम्पलोव्हने 11 चेंडूत 4 चौकारांसह 22 तसेच कर्णधार बिबीने 10 धावा केल्या. थायलंडतर्फे मायाने 22 धावांत 2 तर ओनिच्याने 27 धावांत 3 तसेच थिपच्या आणि लाओमी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक - थायलंड 20 षटकात 9 बाद 120, हाँगकाँग 20 षटकात 7 बाद 114.