थायलंडची भारतावर मात
2-0 गोलफरकाने मात
वृत्तसंस्था/पथुम थानी (थायलंड)
यजमान थायलंड आणि भारत यांच्यात झालेल्या मित्रत्वाच्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यात भारतीय फुटबॉल संघाला एकतर्फी हार पत्करावी लागली. या सामन्यात थायलंडने भारताचा 2-0 अशा गोलफरकाने पराभव केला. आगामी होणाऱ्या महत्त्वाच्या आशिया चषक पात्रफेरी स्पर्धेपूर्वी हा सामना महत्त्वाचा होता. या दुसऱ्या सामन्यात आठव्या मिनिटाला थायलंडचे खाते बेंजामिन डेव्हीसने उघडले. मध्यंतरापर्यंत थायलंडने भारतावर 1-0 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर थायलंडचा दुसरा गोल 59 व्या मिनिटाला पोरामेत अर्जिव्हिलायने केला. गेल्या बुधवारच्या सामन्यात भारताला थायलंडने नमविले होते. तत्पूर्वी भारतीय फुटबॉल संघाने झालेल्या दोन सामन्यांत थायलंडला पराभूत केले होते. फिफाच्या मानांकनात थायलंड 99 व्या तर भारत 127 व्या स्थानावर आहे. 2019 च्या एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात भारताने थायलंडचा 4-1 असा पयराभव केला होता. त्या सामन्यात भारताच्या सुनील छेत्रीने दोन गोल नोंदविले होते. एएफसी आशिया चषक पात्र फेरी स्पर्धेत भारताचा सामना हाँगकाँगबरोबर 10 जूनला होणार आहे. तसेच थायलंडचा अंतिम फेरीतील सामना तुर्कीबरोबर खेळविला जाईल.