For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोकण दौऱ्यात ठाकरे लोकसभेचे रणशिंग फुंकणार

06:50 AM Jan 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
कोकण दौऱ्यात ठाकरे लोकसभेचे रणशिंग फुंकणार
Advertisement

कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला, याच बालेकिल्ल्याला वर्षभरापूर्वी भगदाड पडले. तब्बल सहा आमदार पक्ष सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. त्यामुळे आमदार गेले, नेतेमंडळी गेली, पक्ष गेला आणि चिन्हही गेले. अशा परिस्थितीत तोंडावर येऊन ठेपलेली लोकसभा निवडणूक पक्ष आणि पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख ठाकरे हे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात चार दिवसांच्या कोकण दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा हा तपास यंत्रणेत अडकलेले आमदार, बहुचर्चित बारसू रिफायनरी आणि आमदारांची गद्दारी याभोवती फिरताना लोकसभेच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार हे निश्चित झाले आहे.

Advertisement

गेल्या वर्षी जून महिन्यात शिवसेनेमध्ये राज्य पातळीवर मोठी फूट पडून सत्तांतर झाले. यामध्ये शिवसेनेच्यादृष्टीने अभेद्य असलेल्या कोकणातही मोठा हादरा बसला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तीन जिल्ह्यांचा विचार केला तर पंधरा विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये शिवसेनेचे तबल नऊ आमदार निवडून गेले होते. आता त्यातील सहा आमदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सहभागी झाले आहेत. रायगड लोकसभा मतदार संघातील महाडचे आमदार भरत गोगावले, आ†लबागचे आमदार महेंद्र दळवी, कर्जत-खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे, खेड-दापोली मतदार संघाचे योगेश कदम, त्यानंतर सिंधुदुर्गातून दीपक केसरकर, रत्नागिरीतून उदय सामंत यांनी शिंदे यांना साथसंगत केल्याने शिवसेनेच्या वर्षानुवर्षे अभेद्य असलेल्या या गडाला कोकणात मोठे भगदाड पडले आहे. त्यातील केसरकर आणि सामंत हे दोघेही मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री, तर भरत गोगावले हे विधानसभेत पक्षाचे प्रतोद आहेत.

Advertisement

शिवसेनेचा मूळ पाया हा कोकण असल्याने पक्षफुटीनंतर शिंदे असोत अथवा ठाकरे असोत त्यांनी कोकणवर पुरेपूर लक्ष दिले. दोघांकडूनही कोकणातील आपले अस्तित्व टिकवण्याची धडपड सुरू केली. मात्र मध्यंतरी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत फुटीचा तितकासा परिणाम ठाकरे शिवसेनेवर झालेला दिसून आलेला नाही. आमदार पक्ष सोडून गेल्यानंतर कोकणात शिवसेना नेमकी कुणाची याचे उत्तर लोकसभा निवडणुकीतून मिळणार असल्याने शिवसेनेच्या दोन्ही गटाच्यादृष्टीने लोकसभा निवडणूक ही महत्त्वाची ठरणार आहे.

आमदारांच्या बंडखोरीनंतर पक्ष गेला, धनुष्यबाण चिन्हही गेले. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत नवे मशाल चिन्ह घेऊन ठाकरे गटाला सामोरे जावे लागणार आहे. आजपर्यंत शिवसेना म्हणजेच धनुष्यबाण ही ओळख मतदारांच्या मनात खोलवर रूजलेली आहे. त्यामुळे आता शिवसैनिकांना बाहेर पडून मशाल पेटवावी लागणार आहे. त्यामुळेच ठाकरे गटाचे पक्षप्रमुख फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात रायगडमध्ये दोन दिवस तर सिंधुदूर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात दोन असे चार दिवस कोकणच्या दौऱ्यावर येत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे हे रायगड येथून दौऱ्याला सुरूवात करणार आहेत. एक आणि दोन फेब्रुवारी रोजी रायगड जिह्यात पोलादपूर, म्हसळा, माणगाव, अलिबाग, रोहा आणि पेण येथे विभागवार सभा घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला असलेल्या विशेषत: रोह्यात देखील ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या भव्य अशा होणाऱ्या सभांकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. रोहासह संपूर्ण जिह्यात होणाऱ्या सभांमुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे. संपूर्ण जिल्हा ढवळून निघाला आहे.

राष्ट्रवादी (अजित पवार) गटाने शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत आघाडी सरकारमध्ये सामील झाल्याने रायगड जिह्यातील राजकीय समीकरण बदलले आहे. त्यामुळे ठाकरे हे आपल्या दौऱ्यात जिह्यातील शिवसैनिकांशी संवाद साधतानाच ते शिंदे गटाचा, तसेच भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाचा समाचार घेण्याची शक्यता आहे.

रायगडनंतर ठाकरे हे सिंधूदुर्ग, रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. 4 फेब्रुवारी रोजी सावंतवाडी, कुडाळ, मालवण, आंगणेवाडी भराडी देवी दर्शन, कणकवली असा दौरा आहे. या दौऱ्यादरम्यान ठाकरे हे आमदार वैभव नाईक यांच्या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. त्यानंतर नाईक यांच्या घरी त्यांचा मुक्काम असणार आहे. त्यानंतर 5 फेब्रुवारी रोजी ते बारसू, राजापूर, रत्नागिरी, देवऊख, चिपळूण या ठिकाणचा दौरा करणार आहेत. राजापूरचे आमदार राजन साळवी आणि कुडाळचे आमदार वैभव नाईक हे सध्या तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. या दौऱ्यात ठाकरे हे राजापूर येथे साळवी यांच्या समर्थनासाठी छोटेखानी सभा, तर आमदार वैभव नाईक यांच्या घरी फक्त बैठकच घेणार नाही तर मुक्कामही करणार आहेत. यातून शिवसेना ठाकरे गट हा आपल्या पदाधिकाऱ्यांच्या पाठिशी असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

लोकसभेसाठी पुन्हा ‘रिफायनरी’

नाणार रिफायनरीची घोषणा झाल्यापासून प्रत्येक निवडणूक ही रिफायनरी या मुद्द्याभोवती फिरली. मोर्चे, आंदोलने, बैठकांसह आरोप-प्रत्यारोपाच्या जंजाळात अडकलेल्या रिफायनरीचे त्रांगडे अजूनही सुटलेले नसल्याने याही लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये हा मुद्दा शिवसेनेच्यादृष्टीने अग्रस्थानी असणार हे स्पष्ट झाले आहे. चार दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लोटेतील कार्यक्रमात रिफायनरी ही रत्नागिरीतच होणार हे ठणकावून सांगत विरोध करणाऱ्यांची ताकद आवळत चालल्याचे सांगत पुन्हा विरोधकांना डिवचले आहे. त्यामुळे कोकण दौऱ्यात बारसूतील स्थानिकांची पुन्हा एकदा ठाकरे भेट घेण्याची शक्यता आहे. बारसूमधील काही स्थानिकांची रिफायनरी विरोधी भूमिका असताना ठाकरे गटाने स्थानिकांच्या बाजूने उभे असल्याचं वेळोवेळी सांगण्यात आले आहे. ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री असताना नाणार ऐवजी रिफायनरीसाठी बारसू या गावात प्रकल्प करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राला पाठवला होता. त्यानंतर बारसूमध्ये रिफायनरीच्या हालचाली सुरू झाल्या. त्यानंतर स्थानिकांनी रिफायनरी प्रकल्पाला मोठा विरोध सुरू केला आहे. त्यानंतर ठाकरे यांनी आम्ही स्थानिकांसोबत असल्याचे म्हणत पुन्हा विरोध केला आहे.

रत्नागिरी, रायगडवर विशेष लक्ष

कोकणच्या रत्नागिरी-सिंधुदूर्ग आणि रायगड या दोन्ही लोकसभा मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटाचे विशेष लक्ष असेल आणि त्यानुसार निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तयारी केली जात आहे. सद्यस्थितीत रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ठाकरे गटाचे विनायक राऊत, तर रायगडमध्ये राष्ट्रवादीचे सुनील तटकरे हे खासदार आहेत. यामध्ये तटकरे यांनी अजित पवार यांना साथ देऊन भाजपाला पाठींबा दिला आहे. रायगडमध्ये महाआघाडीच्या निवडणूक सुत्रानुसार राष्ट्रवादीच्या वाट्याला हा मतदारसंघ जात असला तरी येथे माजी केंद्रीय मंत्री, शिवसेना नेते अनंत गीते यांनी आपल्या सातव्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. शक्यतो रायगड हा मतदारसंघ ठाकरे गट गीतेंसाठी आपल्याकडे घेऊन त्या बदल्यात कल्याण अथवा भिवंडी राष्ट्रवादीला देण्याची तयारी सुरू आहे. किंबहुना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच तसा आग्रह धरला आहे. त्यामुळे येथे मतदारसंघाची अदलाबदल शक्य आहे.

राजेंद्र शिंदे

Advertisement
Tags :

.