ठाकरे विरूध्द ठाकरे
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे द्वंद्व गेल्या दोन दशकांतल्या महाराष्ट्रातल्या राजकारणातले सर्वांत तीव्रतेनं लढलेले आणि चर्चिले गेलेले द्वंद्व आहे. राज ठाकरे यांच्या गाडीवर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सुपारी फेकल्यानंतर या अॅक्शनला रिअॅक्शन देताना मनसे सैनिकांनी उध्दव ठाकरे यांच्या गाडीवर शेण, बांगड्या फेकल्या. ठाण्यात शिवसैनिक आणि मनसैनिक यांच्यात जोरदार राडा झाला. या घटनेचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले. या घटनेचा काहींनी निषेध तर काहींनी समर्थनही केले. शिवसेनेत फुट पडल्यानंतर आगामी पहिलीच विधानसभा निवडणूक होत असल्याने उध्दव ठाकरेंसाठी जशी ही निवडणूक अस्तित्वाची, तशी मनसेच्या भूमिकेवऊन सातत्याने आरोप करणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी राज ठाकरे यांच्यासाठी देखील ही निवडणूक तितकीच महत्त्वाची असणार आहे.
महाराष्ट्रातील राजकारणाला कुटुंब कलहाचा मोठा शाप आहे. राजकारणात एखादी व्यक्ती स्थिरस्थावर झाल्यावर आपल्या नातेवाईकांची आपल्या हयातीतच वर्णी लावण्याचा प्रयत्न करतो, मात्र कालांतराने त्या नातेवाईकालाच आव्हान आणि शह देण्याचा प्रयत्न झाला आहे. वाढती राजकीय महत्त्वाकांक्षा, मोठ्या राजकीय नेत्याचा नातेवाईक त्यामुळे मग पुतणे असो की भाऊ त्यांच्या मुळ नेत्याला डॅमेज करण्यासाठी घरातीलच सदस्याला फोडण्यात येते.
महाराष्ट्रात पवार, ठाकरे, मुंडे, क्षिरसागर या राजकीय घराण्यातील पुतण्यांनी ज्या काकांनी आपल्याला मोठे केले त्यांच्या विरोधात जाऊन आपली राजकीय भूमिका घेतली. मात्र या सगळ्यात राज ठाकरे यांचे वेगळेपण म्हणजे राज यांनी सत्तेसाठी कोणत्याही पक्षात न जाता स्वत:चा राजकीय पक्ष काढला. 9 मार्च 2006 ला मनसे पक्षाची स्थापना केल्यानंतर अवघ्या तीन वर्षात झालेल्या 2009 च्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत मनसेने 13 आमदार निवडून आणण्याचा विक्रम केला. या निवडणुकीत मनसेच्या इंजिनाने शिवसेनेसह सगळ्यांना धडक दिली होती मात्र राज यांच्या मनसेचा करीष्मा त्यानंतर झालेल्या दोन निवडणुकीत काही चालला नाही.
2009 च्या लोकसभा निवडणुकीत मनसेमुळे मुंबईत शिवसेना भाजप युतीच्या सहाच्या सहा जागा पडल्या होत्या, यावेळी राज ठाकरे यांनी दिलेली प्रतिक्रिया होती ‘एक ही मारा लेकीन सॉलीड मारा’. निवडणूक रणनितीचा भाग म्हणून या प्रतिक्रियेला महत्त्व होते. मात्र काल उध्दव ठाकरे यांना मनसे सैनिकांनी दिलेल्या प्रत्युत्तरानंतर मनसे कार्यकर्त्यांचे कौतुक करताना जशास तसे नाही तर जशास दुप्पट असे उत्तर दिल्याचे राज ठाकरे म्हणाले. राज यांच्या या दोन प्रतिक्रियांमध्ये जसा बदल झाला तसा तो त्यांच्या भूमिकेमध्ये देखील वारंवार
झाला.
राज यांचं प्रभावी वक्तफत्व आणि मनसेची रस्त्यावरच्या आंदोलनांची आक्रमक स्टाईल यामुळे नेहमीच त्यांच्या बाजूने वातावरण तयार झाले. मुंबई, पुणे, नाशिक कोकणात मोठ्या संख्येनं नगरसेवक निवडून आले. मनसेमुळे असंख्य ठिकाणी सेना-भाजपाच्या उमेदवारांना पराभवाला सामोरं जावं लागलं. राज यांनी नेहमीच मराठी माणसाच्या हिताचे विषय घेतले, मात्र राज्यात एकीकडे शिवसेना-भाजप युती दुसरीकडे राज ठाकरे यांचा मनसे पक्ष त्यामुळे राज यांच्यापेक्षा शिवसेना-भाजप युतीच कालांतराने लोकांना जवळचा पर्याय वाटु लागला. आता मात्र उध्दव ठाकरे यांची शिवसेना महायुतीत नसल्याने राज यांना शिवसेनेची ती स्पेस मिळू शकते, मात्र त्यासाठी राज यांनी काही ठोस राजकीय भूमिका घेण्याची गरज आहे.
शिवसेना फुटीनंतर गेल्या 15 वर्षांत स्वत:ला आणि त्यांच्या ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’ला सिद्ध करण्याची हुलकावणी देत आलेली संधी आता राज यांना मिळाली आहे. शिवसेनेत बंड झाल्यानंतरही उध्दव ठाकरे यांनी नवीन पक्ष, नवीन चिन्ह घेऊन निवडणूक लढविताना स्वत:ला सिध्द केले. भाजप-शिवसेना महायुतीला लोकसभा निवडणुकीत राज्यात रोखण्यात शरद पवारांबरोबरच उध्दव ठाकरे यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. उध्दव ठाकरे यांनी पहिल्या दिवसापासून भाजप विरोधात जोरदार आघाडी उघडली, मग ते पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत अमित शहा की देवेंद्र फडणवीस या सगळ्या नेत्यांवर आरोप करताना त्यांनी हातचे काही ठेवले नाही. ठाकरे यांनी एकमेव भाजप विरोधी भूमिका घेताना राज्यात महाविकास आघाडीला तर देशात इंडिया आघाडीला बळ दिले.
राजकारणात तुमची भूमिकाच महत्त्वाची मानली जाते, राज यांनी शिवसेनेत फुट पडल्यानंतर चिन्हाचा वाद सुरू असताना माझ्याकडे चिन्ह असले काय आणि नसले काय “जो विचार माझ्या आजोबांचा, बाळासाहेबांचा, त्या विचारांचा वारसा मी चालवतोय, असे म्हटले होते, तर शिवसेना हे पक्षाचे नाव आणि चिन्ह ज्या दिवशी एकनाथ शिंदे यांना मिळाले, त्या दिवशी राज यांनी लिहीले होते, “एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशीबालाच स्वत:चं कतफ&त्व समजू लागतो, त्या दिवशी त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरू होतो. “मात्र चिन्ह आणि पक्ष गेल्यानंतरही उध्दव ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत स्वत:ला सिध्द केले.
2022 ला उध्दव ठाकरे हे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आणि नवीन मशाल चिन्ह घेऊन लढले. उध्दव ठाकरेंवर सातत्याने वडिलांचा पक्ष मिळाल्याचा आरोप केला जायचा तो बाळासाहेबांचा पक्ष आणि चिन्हाचा वारसा देखील आता त्यांच्याकडे राहिला नाही. त्यामुळे एक प्रश्न राज्याच्या राजकारणात आजही जिवंत आहे, तो म्हणजे बाळासाहेबांच्या राजकारणाचा वारसदार कोण, राज की उद्धव? सध्याच्या दुफळी झालेल्या शिवसेनेमुळे ही वारसदारी सिद्ध करण्याची संधी राज यांना पुन्हा मिळाली आहे तसेच उध्दव ठाकरे यांना आपल्या स्वत:च्या पक्षाचे नेतृत्व आणि कर्तृत्व सिध्द करण्याची संधी या निवडणुकीत असणार आहे. मात्र ही निवडणूक होईपर्यंत या दोन पक्षात सातत्याने टोकाचा सामना होणार आहे. कुरघोडीचे राजकारण रंगणार आहे, हे करताना मात्र मराठी माणसाचे नुकसान होणार याची काळजी घेतली पाहिजे अन्यथा महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही.
प्रवीण काळे