Kolhapur : शिनोळी सीमेवर ठाकरे गटाची जोरदार निदर्शने
‘बेळगाव आमच्या हक्काचं’ – शिनोळीत ठाकरे गटाचा एल्गार
चंदगड : 'बिदर, भालकी, निपाणी, बेळगाव, कारवारसह संपूर्ण सीमा भाग संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, 'बेळगाव आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!, 'मराठी बांधवांवरील अन्याय, दूर करा' अशा घोषणामध्ये शनिवारी शिनोळी येथे बेळगाव-वेंगुर्ले राज्यमार्गावर शिवसेना ठाकरे गटातर्फे जोरदार निदर्शन करण्यात आली. यावेळी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
भाषावार प्रांतरचना केल्यानंतर १९५६ साली बेळगावसह मराठी भाषिकांना अन्यायाने कर्नाटकात ढकलण्यात आले. त्यानंतर सीमा भागातील मराठी बांधव गेली ६९ वर्षे मातृभाषेसाठी अखंड लढा देत आहेत. दरवर्षीप्रमाणे १ नोव्हेंबर रोजी 'काळा दिन' पाळत मराठी बांधवांना समर्थन देण्यासाठी व केंद्राच्या निष्क्रिय भूमिकेविरोधात शनिवारी शिनोळी येथे जोरदार निदर्शने झाली.
सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाही कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांवर कन्नड सक्तीचा वरवंटा फिरवला जात असल्याची तीव्र टीका करण्यात आली. मराठी शाळा बंद केल्या जात आहेत, शासकीय व्यवहारांत कन्नड सक्ती केली जाते, मराठी पाट्यांवर दडपण आणलं जातं, ही मानवी हक्कांची उघड पायमल्ली असल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्यांनी केला.
'सीमा प्रश्नाचा निकाल लागेपर्यंत हा भाग केंद्रशासित ठेवावा, ही मागणी पुन्हा एकदा बुलंद करण्यात आली. मात्र, केंद्र सरकार याकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नेत्यांनी केला. यांचे नेतृत्व जिल्हा प्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांनी केले. त्यांच्या सोबत उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील, चंदगड विधानसभा प्रमुख राजू रेडेकर, विधानसभा सह-संपर्कप्रमुख रियाज शमनजी, महिला जिल्हा संघटिका शांताताई जाधव, युवा सेना जिल्हा प्रमुख अवधूत पाटील, चंदगड प्रभारी तालुका प्रमुख विष्णू गावडे, गणेश बागडी, तालुका प्रमुख दिलीप माने, अजित खोत, आजरा तालुका प्रमुख युवराज पवार, महेश पाटील, महादेव गुरव, पदाधिकारी उपस्थित होते.
निदर्शन आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चंदगड पोलिसांनी महाराष्ट्राच्या हद्दीत आणि बेळगाव पोलिसांनी त्यांच्या बाजूला मोठा फौजफाटा तैनात केला होता. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस शिनोळीपर्यंतच धावल्या, पुढील प्रवासासाठी प्रवाशांना वडाप वाहनांवर अवलंबून राहावं लागलं. काही निदर्शकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशीअंती सोडून दिलं. 'सीमा प्रश्न हा फक्त सीमावासीयांचा नाही, तर तो प्रत्येक मराठी माणसाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. जोपर्यंत बेळगाव महाराष्ट्रात येत नाही, तोपर्यंत लढा थांबणार नाही, असा संदेश या निदर्शनांतून शिवसेनेने पुन्हा एकदा दिला.