कोल्हापुरात टीईटी परीक्षा सुरळीत
कोल्हापूर :
पुणे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने रविवारी शिक्षक पात्रता (टीईटी) परीक्षा कोल्हापुरातील 28 परीक्षा केंद्रावर सुरळीत पार पडली. सकाळी 10 ते 1 दरम्यान पहिल्या पेपरला 6 हजार 104 पैकी 5 हजार 760 परीक्षार्थी बसले होते. तर 344 परीक्षार्थी गैरहजर होते. तसेच दुपारी 2 ते 5 दरम्यान दुसऱ्या पेपरला 9 हजार 677 पैकी 9 हजार 176 परीक्षार्थी बसले होते. तर 501 परीक्षार्थी गैरहजर होते. बायोमेट्रिक करून आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून भावी शिक्षकांना परीक्षा केंद्रात सोडले. परीक्षा केंद्रांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. तसेच परीक्षा कामकाजाचे व्हिडीओ शुटींग करण्यात आले.
टीईटी परीक्षेमध्ये कोणताही गैरप्रकार घडू नये म्हणून 28 परीक्षा केंद्रावर सहा परिरक्षकांचे बैठ्या पथकांची नियुक्ती केली होती. प्रत्येक वर्ग खोलीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर होती. परीक्षेच्या कामासाठी सात झोनल ऑफीसर, 28 परीक्षा केंद्र संचालक, 4 उपकेंद्रसंचालक, 28 सहाय्यक परीरक्षक, एक जिल्हा परिरक्षक, 87 पर्यवेक्षक, 423 समवेक्षक, 58 लिपिक, 116 सेवक असा सुमारे 752 लोक परीक्षेचे कामकाज पाहिले. सर्व परीक्षा कामकाजाचे व्हिडीओ शुटींग केले. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व शिक्षणाधिकारी (योजना)च्या अधिकाऱ्यांचे भरारी पथकात समावेश होता. पहिल्या पेपरला सकाळी 9 वाजता तर दुसऱ्या पेपरला दुपारी 1 वाजता परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. पहिल्या पेपरला मराठी 30, गणित 30, परिसर अभ्यास 30, बालमानसशास्त्र 30, इंग्रजी 30 असे 150 गुणांची प्रश्नपत्रिका होती. दुसऱ्या पेपरला मराठी 30, गणित 30, बालमानसशास्त्र 30, इंग्रजी 30, विज्ञान 30, समाजशास्त्र 30 असे 150 गुणांचे प्रश्न होते. परीक्षेमध्ये उत्तीर्ण उमेदवारांना पहिली ते आठवीपर्यंतच्या शिक्षक भरतीसाठी पात्र ठरवले जाणार आहे. परीक्षा केंद्राच्या बाहेर परीक्षार्थीचे पालक पेपर सुटेपर्यंत बसले होते. काहींनी पेपर क्रमांक एक व दोन दिला, तर काहींनी दोन्हीपैकी एकच पेपर दिला. ही परीक्षा शहरातील महाराष्ट्र हायस्कूल व न्यू कॉलेज, एस.एम. लोहीया हायस्कूल, विवेकांनंद कॉलेज, प्रायव्हेट हायस्कूल, छत्रपति शाहू विदयालय न्यू पॅलेस, न्यू हायस्कूल पेटाळा, न्यू मॉडेल इग्लीश स्कूल, प्रिन्सेस पदमाराजे गर्ल्स हायस्कूल, सेंट झेव्हियर्स हायस्कूल यासह 28 परीक्षा केंद्रावर झाली. परीक्षे दरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, डायटचे प्राचार्य डॉ. राजेंद्र भोई, माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, शिक्षणाधिकारी (योजना) अनुराधा म्हेत्रे यांनी परीक्षा केंद्राला भेट देऊन पाहणी केली.
तीन वर्षानंतर टीईटी परीक्षा
टीईटी परीक्षा 2021 ला घेण्यात आली होती. त्यामुळे बीएड अभ्याक्रम पूर्ण केल्यानंतर टीईटी परीक्षेची तब्बल तीन वर्षे प्रतिक्षा करावी लागल्याचे परीक्षार्थींनी सांगितले. तीन वर्षात अभ्यासाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर पडल्याने काहींना पेपर अवघड गेला तर काहींना पेपर सोपा गेल्याची प्रतिक्रिया परीक्षार्थींनी दिली.
लहान मुल तीन तास आईच्या प्रतिक्षेत, बाहेर येताच बिलगले
परीक्षेला आलेल्या परीक्षार्थींचे लहान मुल तब्बल तीन तास परीक्षा केंद्राच्या बाहेर आपल्या आईच्या प्रतिक्षेत बसले होते. त्यांना सांभाळण्यासाठी आलेल्या पालकांनी त्यांना खाऊ आणि मोबाईल देवून शांत बसवण्याचा प्रयत्न केला. आई परीक्षा केंद्राच्या बाहेर येताच ते मुल पळत जावून आपल्या आईला बिलगले. त्यावेळी आईने पटकण आपल्या मुलाला उचलून घेतले. आपला घरसंसार सांभाळत टीईटी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांकडून परीक्षेचा निकाल लागताच पात्र उमेदवारांची शिक्षक म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.