उद्धव ठाकरेंसाठी कसोटीचा काळ
वर्धापन दिनानंतर दोन्ही शिवसेना (ठाकरे गट आणि शिंदे गट) यांच्यात संघर्ष वाढण्यास सुरूवात झाली आहे. उध्दव ठाकरे यांनी वर्धापन दिनाच्या दिवशी माझी हत्या करायची असेल तर सरळ करा कम ऑन किल मी, पण पाठीत खंजीर खुपसू नका, या वक्तव्यातून ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर अप्रत्यक्ष टीका केलीय. याला एकनाथ शिंदे यांनी जे राजकारणात आधीच संपलेत, मेलेत त्यांना पुन्हा काय मारणार असे प्रत्युत्तर दिल्यानंतर, दोन्ही नेत्यांची ही वक्तव्ये पाहता, महापालिका निवडणुकीच्या आधी दोन्ही शिवसेनेतील संघर्ष वाढणार असून, हा संघर्ष केवळ राजकीय नसणार तर हा संघर्ष आपली ओळख, वारसा आणि जनतेवरचा प्रभाव टिकवण्यासाठी असणार आहे.
शिवसेनेच्या दोन्ही गटाचा वर्धापन दिन 19 जून रोजी मुंबईत झाला. शिवसेनेत फुट पडायच्या आधी शिवसेनेचा एकमेव वर्धापन दिन होत असे, दसरा मेळाव्यानंतर शिवसेनेचा वधार्पन दिन हा महत्त्वाचा मानला जात असे. या कार्यक्रमाला स्वत: बाळासाहेब ठाकरे संबोधित करत असत, मात्र आता शिवसेनेत फुट पडल्यानंतर दोन्ही शिवसेनेसाठी वर्धापन दिन आणि दसरा मेळावा हे आपला जनाधार, ताकद दाखवण्याचं महत्त्वाचं व्यासपीठ झालं आहे. दोघांनीही वेगवेगळे कार्यक्रम घेतले, सभांमध्ये मोठा जनसमुदाय जमवण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही पुन्हा एकदा खरी शिवसेना कोणाची? हा प्रश्न अजुनही कायम आहे. शिंदे गटाचा सत्तेत असूनही लोकमान्यतेसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहे, याच प्रयत्नातून पालिकेवर पुन्हा शिंदेंच्या शिवसेनेची सत्ता आली तर, पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठीचा त्यांचा खुट्टा अजुन मजबुत होणार आहे, तर ठाकरे गट बाळासाहेबांची खरी विचारधारा आमच्याकडे असल्याचे म्हणत आहेत. तर दुसरीकडे ठाकरे गटाला लागलेली गळती मात्र उध्दव ठाकरे आणि शिवसेनेसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. मातोश्रीवर बैठकीला हजर राहतात तेच दुसऱ्या दिवशी शिंदे गटात दाखल होतात, यावऊन उध्दव ठाकरे यांचा धाक शिवसेनेत राहिला नसल्याचे दिसत आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडून पराभव झालेल्या बहुतांश आमदारांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. मग त्यात राजन साळवी, स्नेहल जगताप, राजू शिंदे अशा अनेक जणांनी शिवसेनेची साथ सोडली.
मुंबई ठाणे आणि नाशिकमधील नगरसेवक तर लॉटमध्ये भाजप आणि शिंदे गटात प्रवेश करताना दिसत आहे. उध्दव ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्याच आठवड्यात आपल्या पक्षातील माजी नगरसेवकांची बैठक मातोश्री निवासस्थानी बोलवली होती, गेल्या वर्षभरात माजी नगरसेवकांची एक ही बैठक न झाल्याने माजी नगरसेवकांमध्ये अस्वस्थता वाढली होती. या बैठकीत नगरसेवकांना तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही, असे ठाकरे यांनी सांगताना युती किंवा आघाडी करताना तुम्हाला विश्वासात घेण्याचे आश्वासन दिले.
विशेष म्हणजे जे नगरसेवक या बैठकीला उपस्थित राहिले त्यातील अजित भंडारी यांच्यासह काही महत्त्वाचे पदाधिकारी दुसऱ्याच दिवशी शिंदे गटात दाखल झाले, तर रविवारी उबाठाचे दोन माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते हे भाजपमध्ये दाखल झाले. ठाकरे गटाच्या तेजस्वीनी घोसाळकर यांना त्यांच्या पतीच्या जागी मुंबै बॅपेंवर संचालक मंडळावर भाजपने घेतले आहे, त्यांचे सासरे हे उध्दव ठाकरे यांच्या जवळचे मानले जातात.
2024 ची विधानसभा निवडणूक विनोद घोसाळकर यांनी दहिसर विधानसभा मतदार संघातून लढवली होती, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला, जर सासऱ्याऐवजी सून लढली असती तर तेजस्वीनी घोसाळकर यांना त्यांचे पती माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या राजकीय हत्येची सहानुभुती मिळाली असती, आता भाजपने मुंबै बॅपेंवर संचालक मंडळावर घेतल्याने तेजस्वीनी या शिंदे गटात नाही पण भाजपात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठाकरे यांच्या भावनिक आवाहनाला त्यांच्यात पक्षात किंमत राहिलेली नाही, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. एक तर उध्दव ठाकरेंच्या आवाहनात नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना आत्मविश्वास दिसत नाही किंवा भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेसमोर ठाकरे गटातून लढणे आता त्यांना सोपे वाटत नाही. त्यामुळे मुंबईत आता ठाकरे यांच्याकडे 100 पैकी केवळ 48 नगरसेवक उरले आहेत.
मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे महापालिकेत प्रतिनिधीत्व करणाऱ्यांपैकी पहिल्या फळीतील जवळपास सगळे नगरसेवक हे शिंदे गटात दाखल झाले आहेत. आता उरलेल्या 48 नगरसेवकांपैकी काही जणांना पक्षात घेण्यासाठी भाजप आणि शिंदे गटात जोरदार रस्सीखेच बघायला मिळणार आहे. कोकणातील एक माजी आमदार राजन साळवी यांनी माजी खासदार विनायक राऊत यांच्या कारभारला कंटाळून पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर, आता ठाकरे गटाचे कोकणातील म्हणजे मुंबई सोडून, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 39 विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून एकमेव निवडून आलेले आमदार भास्कर जाधव यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. जाधव यांना वर्धापन दिनाच्या कार्यक्रमावेळी भाषण करायला न दिल्याने ते नाराज आहेत. जाधवांनी शरद पवारांना सोडून शिवसेनेत दाखल होणे ही माझ्या आयुष्यातील चुक असल्याचे विधान करणे म्हणजे शिवसेना आणि उध्दव ठाकरे यांच्या कार्यपध्दतीवरच आक्षेप घेण्यासारखे आहे. त्याच वेळी शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील आणि माजी आमदार शहाजी पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर आरोप करताना राऊत यांचाच शिवसेना हायजॅक करण्याचा
प्लॅन होता, तर राऊत हे आमच्यासोबत गुवाहाटीला सर्वात आधी येणार होते असा आरोप केला आहे. भास्कर जाधव यांचा रोखदेखील संजय राऊतांवर दिसत आहे. शिवसेनेत वरूण देसाई, आदित्य ठाकरे यांच्यासारखे नेतृत्व पुढे येण्याचा प्रयत्न करत असले तरी जुने, अनुभवी नेते नाराज होऊ लागले आहेत. मुंबईतील आमदार शिवसेना फुटीच्या काळात शिवसेनेचे विधानसभेतील मुख्य प्रतोद असलेले आमदार सुनिल प्रभु सध्या कुठेच दिसत नाहीत.
राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर प्रभु यांचे नाव विरोधीपक्षासाठी आघाडीवर होते, नंतर ते मागे पडले. राजकारणात रिकामी जागा कधीच राहत नाही, ती जागा कुणीतरी भरतोच मात्र आता प्रश्न हा आहे की उध्दव ठाकरे हे स्वत:ची जागा टिकवून ठेवतील का? शिवसेना आता केवळ एक पक्ष राहिलेली नाही, त्याची दोन शकले झाली. दोन्ही पक्ष संघर्षाचे प्रतीक बनले आहेत, दोन्ही पक्षांमध्ये विचार विऊद्ध सत्ता, वारसा विऊद्ध युती आणि बाळासाहेबांचा आदर्श विऊद्ध नव्या युगातील राजकारण अशी स्पर्धा असल्याने उध्दव ठाकरे यांना आता भावनिक साद घालण्यापेक्षा राजकीय आत्मचिंतनाची गरज आहे.
प्रवीण काळे