For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दोन्ही शिवसेनेसाठी कसोटीचा काळ

06:36 AM Feb 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
दोन्ही शिवसेनेसाठी कसोटीचा काळ
Advertisement

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती काही थांबत नाही, त्यातच कोकणातील माजी आमदार राजन साळवी यांनी जय महाराष्ट्र केल्यानंतर आता विद्यमान आमदार भास्कर जाधव हे ठाकरे गटाला रामराम करणार असल्याची चर्चा होती. मात्र जाधव यांनी माझ्या क्षमतेप्रमाणे गेल्या 43 वर्षांमध्ये मला पुरेपूर काम करण्याची संधी मिळाली नसल्याची खंत व्यक्त केली, तर दुसरीकडे दिल्लीत घडलेल्या राजकीय घडामोडीचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. ठाकरे गटाच्या 9 खासदारांपैकी 6 खासदार फोडल्यास एकनाथ शिंदे यांचे दिल्लीतील वजन नक्कीच वाढेल, तब्बल 15 खासदारांच्या जोरावर ते पुन्हा महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदासाठी दावा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ठाकरे गटासमोर एकीकडे आमदार तर दुसरीकडे खासदार सांभाळण्याचे मोठे आव्हान असणार आहे. तर शिंदे यांची शिवसेना कधीही फुटु शकते. सहा महिन्यापूर्वी महाराष्ट्रात एक नंबरवर असणारे मुख्यमंत्री शिंदे हे फडणवीस यांच्याशी तुटलेल्या संवादामुळे दुसऱ्यावऊन तिसऱ्या क्रमांकावर गेल्याचे दिसत आहे.

Advertisement

शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभेत 9 आणि राज्यसभेत 2 असे मिळुन 11 खासदार आहेत. संसद भवनात गेल्याच आठवड्यात ठाकरे यांच्या पक्षाला हक्काचे कार्यालय मिळाले आहे. ठाकरे यांची शिवसेना संपली असे जरी सगळे सांगत असले तरी दिल्लीतील त्यांचे महत्त्व 9 खासदार असल्याने कायम राहणार आहे, देशातील मोदी सरकारकडे स्पष्ट बहुमत नाही, त्यातच 2025 च्या शेवटी बिहार विधानसभा निवडणूक होणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री असणारे नितीशकुमार हे राजकारणात पलटुराम नेते म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्रात भाजपने विधानसभा निवडणुकीनंतर संख्याबळाच्या आधारे एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री केले. त्याप्रमाणे बिहारमध्येही विधानसभा निवडणुकीनंतर होऊ शकते. नितीशकुमार यांनी मोदी सरकारचा पाठिंबा काढला तर उध्दव ठाकरे यांच्याकडे असणारे 9 खासदार हे कधीही महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे उध्दव ठाकरे यांचे खासदार फोडण्यासाठी प्रयत्न होऊ शकतात, ठाकरेंच्या 9 पैकी 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या बातम्या आल्या आणि स्वत: आदित्य ठाकरे यांना दिल्ली गाठावी लागली. ज्या 6 खासदारांची नावे चर्चेत आलीत त्यापैकी संजय दिना पाटील हे तसे शिवसेनेचे खासदार असले तरी ते शरद पवारांचेच ऐकणारे आहेत.

शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना दिल्लीत पुरस्कार मिळणार म्हटल्यावर त्या कार्यक्रमाला संजय पाटील हजर राहिले त्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण होते. या कार्यक्रमात शरद पवारांनी एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कार्याची तर शिंदेंनी शरद पवारांच्या राजकारणाची केलेल्या स्तुतीनंतर त्याचे पडसाद मात्र महाराष्ट्रात उमटले. ठाकरे गटाच्या नेत्यांनी थेट पवारांवर विश्वासघात केल्याचा आरोप केला. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे ही जोडी आता क्वचितच मंत्रीमंडळ बैठकीतच पहायला मिळत आहे. उलट मुख्यमंत्र्यांसोबत अजित पवारच जास्त दिसत आहेत, राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून सततच्या नाराजी नाट्यामुळे शिंदे आणि त्यांची शिवसेना सतत

Advertisement

बॅकफुटला जात असल्याचे दिसत आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर शिंदे यांची पोकळी अजित पवारांच्या पाठिंब्यामुळे भरल्याने शिंदे हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. राज्यातील राजकारणात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे वर्चस्व वाढणे हे शरद पवारांनाही आवडणारे नाही. त्यामुळे शिंदे यांची दिल्लीतील कार्यक्रमात पवारांनी केलेली स्तुती आणि पवारांकडे असलेले आठ खासदार हे केव्हाही राज्यातील राजकारण बदलण्यासाठी केव्हाही महत्त्वाचे ठरू शकतात. अमित शहा यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांचे चांगले सुर जुळले आहेत, मोदी सरकारला नितीश कुमार यांचा बारा खासदारांचा तर तेलगु देसम पार्टीच्या 16 खासदारांचा पाठिंबा असल्याने मोदी सरकार दिल्लीत सत्तेवर आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्या सात खासदारांचा मोदी सरकारला पाठिंबा आहे. उध्दव ठाकरेंकडे असणारे 9 खासदारही भाजपसाठी भविष्यात महत्त्वाचे आहेत. त्यामुळे जोपर्यंत उध्दव ठाकरे यांच्याकडे 9 खासदार आहेत, तोवर भाजपसाठी ठाकरे हे महत्त्वाचे असणार आहेत. तर राज्याच्या राजकारणात पुन्हा मुख्यमंत्री म्हणून परतायचे असेल तर आता भाजपला आमदारांची नाही तर खासदारांची संख्या वाढवून काही शक्य होईल का? हा बी प्लान शिंदे यांचा असू शकतो. कारण अजित पवार यांच्याकडे केवळ एकच खासदार आहे, दिल्लीतील नेतृत्वाला सुध्दा महाराष्ट्रातील अजुन एखादा प्रादेशिक पक्ष हा सोबत येत असल्यास केंद्रातील सत्ता भक्कम करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्रातील राजकारण हे दिल्लीतील घडामोडींवरच अवलंबून असणार आहे आणि याची कुठेतरी सुरूवात झाल्याचे दिसत आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेना कधीही फुटु शकते, हे माहित असल्याने शिंदे स्थानिक पातळीवर पक्षवाढीसाठी प्रयत्न करत असून, ठाकरे गटाचे विश्वासु सहकारी फोडून, सध्या आपल्याचसोबत असणाऱ्या निष्ठावंत शिलेदारांविरोधात पर्यायांची चाचपणी करत आहेत. राजन साळवी यांचा पक्षप्रवेश ही त्याचीच रणनिती असल्याचे बोलले जात आहे.

...तर कोकणाला पुन्हा विरोधीपक्ष नेते पद

43 वर्षात आपल्याला पुरेपुर काम करण्याची संधी मिळाली नसल्याचे भास्कर जाधव म्हणाले. भास्कर जाधव हे विधीमंडळातील सर्वात अनुभवी आणि अभ्यासू सदस्य म्हणून ओळखले जातात. आता त्यांच्या क्षमतेचा विचार केला तर त्यांना विरोधीपक्ष नेतेपदच सध्या ज्या पक्षात आहेत, तेथे मिळू शकते. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिह्यांचा विचार करता, शिवसेना ठाकरे गटाचे भास्कर जाधव हे एकमेव आमदार निवडून आले आहेत, तर वैभव नाईक हे एकमेव माजी आमदार आता ठाकरे यांच्यासोबत आहेत. 2005 ला नारायण राणे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर रामदास कदम यांनी शिवसेना सोडून जाऊ नये म्हणून त्यांना विरोधीपक्ष नेते पद देण्यात आले होते. आता भास्कर जाधव यांना हे पद दिले जाऊ शकते. कारण आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधीपक्ष नेते पदासाठी दावा केला जाऊ शकतो आणि महाविकास आघाडीतील शिवसेना या पक्षाचे सर्वाधिक 20 आमदार असल्याने रामदास कदम यांच्यानंतर कोकणातील विरोधीपक्ष नेता होऊ शकतो. कोकणातील शिवसेनेचे गतवैभव आणण्यासाठी भास्कर जाधव यांना विरोधीपक्ष नेता बनविणे हाच पर्याय असू शकतो.

प्रवीण काळे

Advertisement
Tags :

.