दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यास विलंब होणार नाही !
तहसिलदार श्रीधर पाटील यांची दिव्यांग सेनेच्या पदाधिकाऱ्यांना ग्वाही!
ओटवणे प्रतिनिधी
कोणताही दिव्यांग बांधव संजय गांधी योजनेपासून वंचित राहणार नसुन दिव्यांग व्यक्तीची गरज ओळखून जास्तीत जास्त दिव्यांगाना अंत्योदय योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच शासन जीआर प्रमाणे दिव्यांगाना त्यांच्या मागणीप्रमाणे स्वतंत्र रेशनकार्ड देण्यासह शासनाच्यावतीने दिव्यांग बांधवांसाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही सावंतवाडीचे तहसिलदार श्रीधर पाटील यांनी दिव्यांग सेनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांना दिली. यावेळी दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय देसाई, जिल्हा सचिव अमित गोडकर,भाईसाहेब सावंत आयुवेदिक कॉलेज संस्थेचे सचिव बाळ बोर्डेकर, दिव्यांग सामाजिक कार्यकर्ते अनिल सावंत, तुळशीदास मुरकर, संघटनेचे सदस्य प्रमोद नारकर, दीपक सावंत, श्री. बिरोडकर आदी दिव्यांग बांधव उपस्थित होते. यावेळी तहसिलदार श्रीधर पाटील यांनी दिव्यांग सेनेच्या कार्याचे कौतुक करीत जे दिव्यांग बांधव शासनाच्या विविध योजना पासून वंचित असतील त्यांना आपल्या संघटनेच्या माध्यमातून लाभ मिळवून देऊया आपण नेहमी तुमच्या सोबत आहोत अशी ग्वाही दिली. यावेळी तहसिलदार श्रीधर पाटील यांच्या कार्याची दखल घेऊन शासनाने त्यांचा जिल्ह्यातील उत्कृष्ट तहसिलदार म्हणून सन्मानित केल्याबद्दल दिव्यांग सेनेच्यावतीने त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तहसिलदार श्रीधर पाटील यांनी संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ वृद्धापकाळ योजना तसेच इतर शासनाच्या योजना दिव्यांग निराधार लोकांपर्यंत पोहोचाव्या आणि संबंधित लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी त्यांनी नेहमीच संघटनेला सहकार्य केले. सावंतवाडी तहसील कार्यालयात सध्या शासनाची संजय गांधी समितीची नेमणूक झाली नसली तरी तहसिलदार श्रीधर पाटील यांनी कोणत्याही दिव्यांग बांधवांचा संजय गांधी योजनेचा प्रस्ताव मंजूर करण्यास विलंब केला नाही. यावेळी दिव्यांग बांधवांच्या मतदार नोंदणी बाबत संघटनेला नेहमीच सहकार्य करणाऱ्या निवडणूक शाखा नायब तहसिलदार सौ. तारी आणि संजय गांधी योजनेचा दिव्यांग बांधवांना लाभ देण्यासाठी सहकार्य करत असल्याबद्दल संजय गांधी कार्यालय वरिष्ठ लिफिक श्री. वाडेकर यांचा संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला.