टेस्लाचे पहिलेवहिले शोरुम लवकरच भारतात
इलेक्ट्रीक कारची करणार विक्री : मुंबईत पहिली शोरुम
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जगातील श्रीमंत उद्योजक एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीच्या व्यवसायाची सुरुवात भारतात सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आपल्या इलेक्ट्रीक कारसह कंपनी भारतात प्रवेश करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुढील महिन्यात म्हणजेच जुलैमध्ये मुंबईत आपले पहिलेवहिले शोरुम सुरु करेल असे सांगितले जात आहे. यानंतर देशाची राजधानी दिल्लीत टेस्ला ही कंपनी आपली दुसरी शोरुम सुरुकरणार आहे.
वाय मॉडेलची होणार विक्री
भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी ही मोठी बातमी आहे. भारत हा कारच्या संदर्भात पाहता जगातला तिसरा सर्वात मोठा देश आहे. टेस्लाने आपल्या पहिल्या टप्प्यातील इलेक्ट्रीक कार्सचा पुरवठा केला आहे. ही कार मॉडेल्स वाय रियर व्हील ड्राइव्ह एसयुव्ही प्रकारात येणार असून जी चीनमधील शांघाय प्लांटमध्ये तयार केली गेली आहे. कंपनीचा दावा आहे की वाय मॉडेलची कार ही जगात सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रीक कार आहे.
हालचाली गतीमान
एलॉन मस्क गेल्या काही कालावधीपासून भारतीय बाजारात उतरण्यासाठी धडपडत आहेत. पण आयात शुल्क व स्थानिक उत्पादनसंबंधी वादामुळे भारतात प्रवेश लांबत गेला आहे. यावर्षी फेब्रुवारीत मस्क यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. यानंतर मस्क यांनी आपल्या हालचाली अधिक गतीमान केल्या आहेत. याचदरम्यान कंपनीच्या 5 वाय मॉडेल कार्स मुंबईत दाखल झाल्या आहेत.