टेस्लाचा ‘सायबरट्रक’ 30 रोजी होणार लाँच
पहिल्या दिवशी 10 लोकांना मिळणार डिलिव्हरी : लाँचिंगपूर्वीच 19 लाख जणांनी केले बुकिंग
वृत्तसंस्था/ टेक्सास
टेस्ला या दिग्गज कंपनीचा पहिला इलेक्ट्रिक पिकअप ‘सायबरट्रक’ शोरूममध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. टेस्ला आपल्या इलेक्ट्रिक पिकअप सायबरट्रकची पहिली डिलिव्हरी 30 नोव्हेंबर रोजी करणार आहे. इलेक्ट्रिक वाहन निर्मिती कंपनीने अमेरिकेतील शोरूम्समध्ये ट्रकचे तयार मॉडेल वितरित करण्यास सुरुवात केली आहे. सायबर ट्रक लॉन्च होण्यापूर्वीच 19 लाख लोकांनी बुक केली असल्याची माहिती टेस्लाकडून देण्यात येत आहे.
कंपनीने नोव्हेंबर 2019 मध्ये सायबर ट्रकचे अनावरण केले आणि बुकिंग सुरू केले होते. टेस्लाने या वर्षी जुलैमध्ये त्यांच्या टेक्सास गिगाफॅक्टरीमध्ये सायबर ट्रकचे उत्पादन सुरू केले आणि त्याच्या पूर्ण उत्पादनाच्या तयार मॉडेलची प्रतिमा शेअर केली. टेस्ला सप्टेंबर 2024 पासून मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू करेल. यासाठी, येत्या काही दिवसांत कंपनी मेक्सिकोमध्ये गिगाफॅक्टरीत सायबरट्रक देखील तयार करेल. हा बनवलेला पहिला सायबर ट्रक आहे, ज्याचा फोटो कंपनीने 15 जुलै रोजी ट्विटरवर शेअर केला होता, ज्यामध्ये कर्मचारी सदस्यदेखील दिसत आहेत.
पहिल्या दिवशी फक्त 10 युनिट्स वितरित करणार
मेक्सिकन दैनिक मिलेनियोच्या मते, ऑस्टिनमधील लॉन्च इव्हेंट दरम्यान सायबरट्रकच्या फक्त 10 ट्रक्स वितरीत केल्या जातील. ही माहिती टेस्लाचे ग्लोबल डायरेक्टर ऑफ प्रोडक्शन डिझाईन प्रमुख, जेवियर वेर्दुरा यांनी गेल्या आठवड्यात दिली.
दरवर्षी 3.75 लाख ट्रक्सची निर्मिती
कंपनीचे सीईओ एलॉन मस्क यांनी नुकतेच सायबर ट्रकबद्दल बोलताना सांगितले होते की, सध्या इलेक्ट्रिक पिकअपला जास्त मागणी आहे. हे लक्षात घेऊन, कंपनी दरवर्षी जास्तीत जास्त क्षमतेसह सायबर ट्रकच्या 3.75 लाख युनिट्स तयार करेल. नवीन ऑर्डर देणाऱ्या खरेदीदारांना डिलिव्हरीसाठी मात्र तब्बल 5 वर्षे प्रतीक्षा करावी लागू शकते, असेही मस्क यांनी सुचीत केले आहे.
सायबरट्रकची अंतर्गत मांडणी
आगामी इलेक्ट्रिक ट्रकच्या इंटीरियरची एकंदर स्टाइलिंग प्री-प्रॉडक्शन युनिट्स आणि कॉन्सेप्ट मॉडेल्ससारखीच आहे. त्याचा एकूण आतील देखावा एका अनोख्या पांढऱ्या आणि राखाडी थीमवर आधारित आहे. त्याचा डॅशबोर्ड लेआउट इतर टेस्ला मॉडेल्ससारखा दिसतो. त्याच्या मध्यभागी 17-इंचाचा टचक्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. स्टीयरिंग व्हील सामान्य टेस्लाकारसारखे चौकोनी आहे. टचक्रीन डिस्प्लेमध्ये बेड कव्हर, सस्पेंशन सेटिंग्ज, स्टीयरिंग अॅडजस्टमेंट आहेत.
अन्य बाबी......
? सायबर ट्रक 0-100 किमी प्रतितास 6.5 सेकंदात वेग घेऊ शकतो
? 3,400 किलोपर्यंत वजन खेचू शकतो. पेलोड क्षमता 1,360 किलो आहे, जी संपूर्ण श्रेणीमध्ये मानक आहे.
? मिड-रेंज व्हेरियंटमध्ये, सायबरट्रक ड्युअल-मोटरसह येईल. ते 4.5 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग वाढवू शकते.
? या दोन्ही प्रकारच्या ट्रक्स पूर्ण चार्जिंगवर 402 किमीचे अंतर कापू शकतील.