तेर्सेबांबर्डे ग्रामपंचायत महोत्सवाला उद्यापासून प्रारंभ; तीन दिवस विविध कार्यक्रमांची मेजवानी
26 ऑक्टोबर : धार्मिक कार्यक्रम आणि दशावतार नाटक
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी 9 वाजता श्री सत्यनारायण महापूजा, सकाळी 11 वाजता महाआरती आणि दुपारी 1 ते 3 या वेळेत महाप्रसाद होणार आहे. दुपारी 2 वाजल्यापासून भजनांचे कार्यक्रम होतील. दुपारी 3 वाजता गाय, म्हैस, रेडा व बैल सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा गावमर्यादित असून, सामाजिक संदेश देणारी असेल.
सायंकाळी 7 वाजता रामकृष्ण हरी भजन मंडळ, तेर्सेबांबर्डे-गावडेवाडी यांचा हरिपाठ होईल. रात्री 9 वाजता देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार मंडळ, चेंदवण यांचा ‘व्यंकटरमणा जय गोविंदा अर्थात महिमा तिरुपती बालाजीचा’ हा ट्रिकसीनयुक्त दशावतार नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
27 ऑक्टोबर : महिलांसाठी खास कार्यक्रम
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ‘सन्मान राजमातेंच्या लेकींचा’ या संकल्पनेतून दुपारी 2 वाजता हळदीकुंकू कार्यक्रम होईल. दुपारी 3 वाजता महिलांसाठी विविध गावमर्यादित स्पर्धा आयोजित केल्या आहेत. सायंकाळी 6 वाजता निवेदक नागेश नेमळेकर यांच्या सूत्रसंचालनाखाली ‘स्मार्ट वहिनी’ हा कार्यक्रम होईल.
यानंतर नृत्यकलाकार समर्थ गवंडी यांचा नृत्याविष्कार, दशावताराच्या जीवनपटावर आधारित विशेष नृत्य आणि अरुण कुमार यांचा मिमिक्री शो सादर केला जाणार आहे.
28 ऑक्टोबर : विद्यार्थी, पुरुष आणि नृत्यप्रेमींसाठी कार्यक्रम
महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता पहिली ते चौथी आणि पाचवी ते सातवी अशा दोन गटांतील विद्यार्थ्यांसाठी फनी गेम्स आयोजित केले आहेत. दुपारी 3 वाजता पुरुषांसाठी विविध गावमर्यादित स्पर्धा होतील. रात्री 9 वाजता संकल्प क्रिएशन डान्स अकॅडमी प्रस्तुत ‘नृत्यरंग’ हा कार्यक्रम सादर होणार आहे.
धार्मिक परंपरा, स्थानिक कलागुण, मनोरंजन आणि ग्रामस्थांच्या सहभागातून साजऱ्या होणाऱ्या या महोत्सवात सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तेर्सेबांबर्डे ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.