महोत्सवाचा निधी शेतकऱ्यांच्या चाऱ्यासाठी; तेर्सेबांबर्डे ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम
ग्रामपंचायत तेर्सेबांबर्डे आयोजित तीन दिवसीय महोत्सवाला सदिच्छा भेट दिल्यानंतर ते बोलत होते. तेर्सेबांबर्डे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 1 च्या पटांगणावर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, त्याला ग्रामस्थ आणि रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, जिल्हा परिषद सदस्य रुपेश कानडे, सरपंच रामचंद्र परब, उपसरपंच माधवी कानडे, ग्रामपंचायत सदस्य अजय डिचोलकर, महेंद्र मेस्त्री, संतोष साटेलकर, गुणाजी जाधव, ग्रामपंचायत सदस्या प्रणाली साटेलकर, रोहिणी कोरगावकर, धनश्री गवस, पोलीस पाटील रमाकांत जाधव, मानकरी रमेश परब आणि ग्रामविकास अधिकारी भूषण बालम आदी उपस्थित होते.
दत्ता सामंत म्हणाले की, गावातील सर्वजण एकत्र आले तर कोणतीही गोष्ट अशक्य राहत नाही. महोत्सव म्हणजे केवळ मनोरंजन आणि सांस्कृतिक कार्यक्रम नव्हे, तर गावातील नागरिकांना एकत्र आणणारा आणि परस्परांमधील सलोखा वाढविणारा उपक्रम आहे. सामूहिक प्रयत्नांतून गावाच्या विकासाला नवी दिशा मिळते. ग्रामपंचायत तेर्सेबांबर्डेने मनोरंजनासोबत सामाजिक हिताचे उपक्रम राबवून महोत्सवाला अधिक अर्थपूर्ण स्वरूप दिले आहे.
कमी पावसामुळे आगामी काळात पाणीटंचाई आणि दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शेतीबरोबरच पशुधनावरही होऊ शकतो. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनल्यास शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत महोत्सवाच्या माध्यमातून जमा होणाऱ्या निधीतून शेतकऱ्यांना चारा उपलब्ध करून देण्याचा विचार दूरदृष्टीचा असल्याचे त्यांनी नमूद केले. या उपक्रमामुळे पशुधनाचे संवर्धन होण्यासोबतच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पाणी अडवा, पाणी जिरवा उपक्रमाचे कौतुक
संभाव्य पाणीटंचाईचा विचार करून ग्रामपंचायतीने जलसंवर्धनाच्या कामांवरही भर दिला आहे. 'पाणी अडवा, पाणी जिरवा' या संकल्पनेतून गावात सुमारे 35 वनराई बंधारे बांधण्यात येत असल्याचे सांगून दत्ता सामंत यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. पशुधनाशी संबंधित गाय, बैल, रेडा आणि म्हैस सजावट स्पर्धांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे कामही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद सदस्य रुपेश कानडे यांनी महोत्सवाच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. ग्रामस्थांचे चांगले सहकार्य मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी सरपंच रामचंद्र परब यांच्या हस्ते दत्ता सामंत यांचा सन्मान करण्यात आला.
महोत्सवातील गाय, बैल, रेडा आणि म्हैस सजावट स्पर्धा, स्मार्ट वहिनी, फनी गेम्स तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, कुडाळ तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, जिल्हा परिषद सदस्य दीपक नारकर, कुडाळचे उपसभापती सीताराम तेली, नगरसेविका संध्या तेर्से आणि बिबवणे सरपंच सृष्टी कुडपकर यांनीही महोत्सवाला भेट देऊन आयोजकांना शुभेच्छा दिल्या.
