दहशतवाद्यांचे टार्गेट ‘6 डिसेंबर’
बाबरी मशीद पतन घटनेचा बदला घेण्यासाठी हल्ल्यांचा कट : दिल्ली कारस्फोटातून उलगडले रहस्य : देशात 32 गाड्या वापरून बॉम्बस्फोट घडवण्याचा विचार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या बॉम्बस्फोटाच्या तपासात गुरुवारी एक मोठा खुलासा झाला. बाबरी मशिदीच्या पाडावाच्या पतन दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी दिल्लीसह अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याचा दहशतवाद्यांचा हेतू होता. यासाठी त्यांनी 32 गाड्यांची व्यवस्था केली होती. ही वाहने बॉम्ब आणि स्फोटकांनी भरून स्फोट घडवले जाणार होते, असे पोलीस तपासात उघड झाले आहे. दरम्यान, दिल्ली लालकिल्ला स्फोटात मृतांची संख्या 13 झाली आहे. दिल्लीतील कारस्फोटानंतर वेगवेगळ्या पातळीवर तपास केला जात असून अटकेतील संशयितांचीही कसून चौकशी सुरू आहे.
अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये ब्रेझा, स्विफ्ट डिझायर, इकोस्पोर्ट आणि आय-20 सारख्या गाड्यांचा वापर करून देशात स्फोट घडवण्याचा विचार असल्याचे उघड झाले आहे. तपास यंत्रणांनी आतापर्यंत चार गाड्या जप्त केल्या आहेत. 10 नोव्हेंबर रोजी स्फोट झालेली आय-20 कार या मालिकेतील सूड उगवण्याच्या हल्ल्याचा भाग होती. या स्फोटांमध्ये आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 20 जण जखमी झाले आहेत, त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, केंद्र सरकारने दिल्लीतील कार स्फोटांना दहशतवादी हल्ला मानला आहे. बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत दहशतवादी हल्ल्याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला.
स्फोटाशी संबंधित वाहनांची चौकशी सुरू
दिल्ली बॉम्बस्फोटात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांकडे एक नाही तर दोन कार असल्याचा पोलिसांना संशय होता. बुधवारी दिल्ली आणि शेजारील उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांमध्ये त्यांचा शोध घेण्यासाठी अलर्ट जारी करण्यात आला. त्यानंतर, हरियाणातील खंडावली गावात एक सोडून दिलेले वाहन आढळल्याचे वृत्त समोर आले. वाहनाची तपासणी करण्यासाठी एनएसजी बॉम्ब स्क्वॉडची टीम पोहोचली होती.
डॉ. शाहीनची कार अल् फलाह विद्यापीठातून जप्त
दिल्ली लाल किल्ला स्फोटप्रकरणासंदर्भात पोलिसांनी आणखी एक कार जप्त केली आहे. ब्रेझा कार स्वत: डॉ. शाहीन चालवत होत्या. ती फरिदाबादमधील अल् फलाह विद्यापीठ कॅम्पसमध्ये पार्क करण्यात आली होती. हरियाणा पोलिसांचे बॉम्ब पथक गुरुवारी सकाळी अल् फलाह विद्यापीठात पोहोचले होते. तेथे सापडलेल्या कारची तपासणी करण्यासाठी व्यापक कुमक मागविण्यात आली होती. सदर कारमध्ये कोणतीही स्फोटके किंवा धोकादायक साहित्य साठवले गेले आहे का हे पाहण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला होता. खबरदारी म्हणून जवळच्या इमारतीही रिकामी करण्यात आल्या.
आतापर्यंत चार कारगाड्या जप्त
आतापर्यंत, तपासात चार वाहने उघडकीस आली आहेत. त्यापैकी एक डॉ. शाहीनच्या नावाने नोंदणीकृत मारुती स्विफ्ट असून ती फरिदाबादमध्ये छाप्यादरम्यान जप्त करण्यात आली होती. त्यात एक असॉल्ट रायफल सापडली होती. दुसरी पांढऱ्या रंगाची आय-20 असून ती उमर नबी चालवत होता. ही कार दिल्लीत बॉम्बस्फोट करण्यासाठी वापरण्यात आली. तिसरी लाल रंगाची इकोस्पोर्ट असून त्याची चौकशी अजूनही सुरू आहे. आता, अल-फलाह विद्यापीठाच्या पार्किंगमधून एक ब्रेझा जप्त करण्यात आली असून ती चौथी कार आहे.
चौकशीत ईडीचा प्रवेश
एनआयए, एनएसजी, आयबी आणि दिल्ली पोलिसांनंतर पाचवी तपास संस्था ईडीने दिल्ली लाल किल्ला बॉम्बस्फोटाच्या चौकशीत प्रवेश केला आहे. डॉक्टरांनी स्फोटके खरेदी करण्यासाठी 23 लाख रुपये कुठून जमवले याची अंमलबजावणी संचालनालय चौकशी करेल. ईडी अल् फलाह विद्यापीठाच्या व्यवहारांचीही चौकशी करणार आहे. आरोपी डॉ. मुझम्मिल, डॉ. आदिल, उमर आणि शाहीन यांनी मिळून अंदाजे 20 लाख रुपये जमवून ते त्यांनी उमरला दिल्याचा तपास यंत्रणेचा दावा आहे.
हापूरमधून सहाय्यक प्राध्यापकाला अटक
दिल्ली पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा जीएस मेडिकल कॉलेजमधील सहाय्यक प्राध्यापक डॉ. फारुक अहमददार यांना अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. फारुक हे पूर्वी हरियाणातील फरिदाबाद येथील अल् फलाह विद्यापीठात वरिष्ठ निवासी अधिकारी म्हणून कार्यरत होते. ते जम्मू काश्मीरच्या बेरवाह जिह्यातील बडगाव, वीरपुरा येथील रहिवासी आहेत. डॉ. फारुक गेल्या वर्षभरापासून हापूरमधील जीएस मेडिकल कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या अटकेनंतर पिलखुआ परिसरात असलेल्या कॉलेज कॅम्पसमध्ये स्थानिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
गृह मंत्रालयाची उच्चस्तरीय बैठक
दिल्लीत गुरुवातीही गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीला गृहमंत्री अमित शाह आणि विविध सुरक्षा संस्थांचे अधिकारी सहभागी झाले होते. गेल्या चार दिवसांपासून सातत्याने बैठकांचा सपाटा सुरू असून तपासकार्य आणि पुढील रणनीती यावर विचारमंथन केले जात आहे. या स्फोटामागील कारणे तपासण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करण्यात आले असून त्यांच्याकडून वेळोवेळी गृह मंत्रालयाला अहवाल सोपवला जात आहे.
डायरीमध्ये 6 डिसेंबरचा उल्लेख
जैश-ए-मोहम्मदशी संबंधित डॉक्टर टेरर मॉड्यूलमधील दहशतवाद्यांनी 6 डिसेंबर रोजी दिल्लीतील सहा ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याची योजना आखली होती, असा धोकादायक खुलासा तपासकर्त्यांनी केला आहे. संशयितांच्या डायरीमध्ये सापडलेल्या नोंदींनुसार सुरुवातीला ऑगस्टमध्ये हल्ल्यांची योजना आखली होती, परंतु कारवाईत विलंब झाल्यानंतर नवीन तारीख निवडण्यात आली. 6 डिसेंबर रोजी बाबरी मशीद पाडाव पतन दिनानिमित्त मोठ्या घातपाताचे नियोजन दहशतवाद्यांकडून सुरू होते. डॉक्टर टेरर मॉड्यूलच्या सदस्यांनी पाच वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये बॉम्बस्फोटांची मालिका घडविण्याची योजना आखली होती, असे चौकशीदरम्यान स्पष्ट झाले आहे.
लाल किल्ला पुन्हा चर्चेत
जानेवारीपासून दिल्लीत दहशत माजवण्याचा कट सुरू होता. अटक केलेल्या आरोपींकडून मिळालेल्या मोबाईल डंप डेटावरून फरिदाबादच्या अल् फलाह विद्यापीठातून अटक केलेले सहाय्यक प्राध्यापक डॉ. मुझम्मिल गनी आणि स्फोटात मारले गेलेले डॉ. उमर नबी यांनी जानेवारीमध्ये लाल किल्ल्याची अनेकवेळा रेकी केली होती. दोघांनाही तेथील सुरक्षा आणि गर्दीची पद्धत समजली होती. 26 जानेवारी रोजी दहशतवादी लाल किल्ल्यावर हल्ला करण्याची योजना आखत होते असा पोलिसांना संशय आहे.
6 डिसेंबर रोजी दिल्लीवर हल्ल्याची योजना
डॉ. उमर नबी 6 डिसेंबर रोजी दिल्लीवर हल्ला करू इच्छित होता, परंतु मुझम्मिलच्या अटकेमुळे ही योजना उधळली गेली. आठ आरोपींच्या चौकशीदरम्यान ही माहिती उघड झाली. या आंतरराज्यीय मॉड्यूलचे केंद्र फरिदाबादमध्ये होते. अटक केलेल्या दहशतवाद्यांपैकी सहा डॉक्टर आहेत. दुसरा संशयित, श्रीनगरचा रहिवासी डॉ. निसार फरार आहे. तो काश्मीरच्या डॉक्टर असोसिएशनचा अध्यक्ष देखील आहे आणि अल् फलाह येथे शिकवत होता. जम्मू काश्मीर सरकारने डॉ. निसारला बडतर्फ केले आहे.
खताच्या पिशव्यांमध्ये स्फोटकांचा साठा
फरिदाबादमधील अल् फलाह विद्यापीठात काम करणारा काश्मिरी डॉ. मुझम्मिल घनी हा खताच्या पिशव्यांमध्ये भरून भाड्याच्या खोलीत स्फोटके साठवत होता. वीस दिवसांपूर्वी जेव्हा मुझम्मिल काही पोत्या साठवण्यासाठी खोलीत आला असता शेजाऱ्यांकडून त्याला विचारणा झाला. यावेळी मुझम्मिलने त्या खताच्या पिशव्या असल्याचे उत्तर दिले होते. या खोलीच्या आसपासच्या भागात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे फुटेजचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
दहशतवादी उमरच्या हालचालींचा मागोवा
पोलिसांनी 50 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेजच्या आधारे गेल्या 24 तासांमधील डॉ. उमर नबीच्या संपूर्ण हालचालींचा मागोवा घेतला. यात तो रविवार, 9 नोव्हेंबर रोजी रात्री दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वेवरून फरिदाबादहून निघाला आणि हरियाणातील नूह जिह्यातील फिरोजपूर झिरका येथील एका ढाब्यावर थांबला. त्याने रात्र तिथे त्याच्या गाडीत घालवली. दुसऱ्या दिवशी सकाळी तो एक्स्प्रेस-वेने दिल्लीला परतला. या मार्गात तो चहा पिण्यासाठी आणि फोन तपासण्यासाठी दोनदा थांबला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो सकाळी 8:13 वाजता बदरपूर टोल ओलांडताना दिसतो. त्यानंतर तो ओखला, कॅनॉट प्लेस, अशोक विहार आणि मध्य दिल्लीमध्ये फिरत होता. दुपारी अशोक विहारमधील एका ढाब्यावर त्याने जेवण केल्यानंतर रामलीला मैदानाजवळील असफ अली रोडवरील एका मशिदीतही गेला होता. याचदरम्यान त्याने पार्किंगमध्ये तीन तास घालवले होते. संध्याकाळी 6:22 वाजता त्याची कार मेट्रो स्टेशनकडे निघाली आणि 6:52 वाजता मोठा स्फोट झाला. या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला आणि 25 हून अधिक जखमी झाले.