आसाममध्ये पाडविला दहशतवाद्याचा मदरसा
राज्य सरकारकडून धडक कारवाई
वृत्तसंस्था /गुवाहाटी
आसाममध्ये पुन्हा एकदा मदरशावर कारवाई करण्यात आली आहे. प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि युएपीए ऍक्ट-43 अंतर्गत मदरशावर बुलडोझर चालवून पाडविला आहे. मोरीगाव जिल्हय़ातील या अवैध मदरशाचे संचालन दशतवादी मुफ्ती मुस्तफाकडून केले जात होते. दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याप्रकरणी पोलिसांनी अलिकडेच मुफ्ती मुस्तफाला जेरबंद केले आहे. आमचे सरकार नेहमीच केंद्रीय यंत्रणांसोबत मिळून काम करत असल्याचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी म्हटले आहे.
आसाम हे राज्य धार्मिक कट्टरवाद्यांचे केंद्र होत असल्याचे आता स्पष्ट होतेय. दहशतवादाच्या 5 मॉडय़ुलचा भांडाफोड तसेच बांगलादेशी नागरिकांच्या 5 ठिकाणांचा शोध लागला असल्याने याचे गांभीर्य समजू शकते. आसाम सरकारने यापूर्वी बीएसएफचे अधिकारक्षेत्र वाढविण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. बीएसएफला प्रशासनाकडून पूर्ण सहकार्य केले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
मोरीगावमध्ये गुरुवारी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम आणि युएपीए अंतर्गत जमीउल हुडा मदरशाला जमीनदोस्त करण्यात आले आहे. या मदरशात 43 जण शिकत होते, त्यांना अन्य शाळांमध्ये प्रवेश मिळाला असल्याची माहिती मुख्यमंत्री शर्मा यांनी दिली आहे. मोइराबारी भागात जमीउल हुदा मदरसा हा मुस्तफाकडून चालविण्यात येत होता. मुस्तफाला अलिकडेच बांगलादेशी दहशतवादी संघटना अंसारुल्लाह बांग्ला टीम आणि एक्यूआयएससोबतच्या संबंध बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती अशी माहिती पोलीस अधीक्षक अपर्णा एन. यांनी दिली आहे.