दहशतवादी राजोआनाला 3 तासांचा पॅरोल
पंजाबच्या माजी मुख्यमंत्र्यांचा मारेकरी
वृत्तसंस्था/ चंदीगड
पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने बेअंत सिंह यांचा मारेकरी दहशतवादी बलवंत सिंह राजोआनाला एका कार्यात सामील होण्यासाठी बुधवारी तीन तासांचा पॅरोल मंजूर केला आहे. राजोआनाचा बंधू कुलवंत सिंह यांचा 14 नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला होता. तर बुधवारी लुधियानातील राजोआना कलां गावातील गुरुद्वारामध्ये होणाऱ्या कार्यात सामील होण्यासाठी राजोआनाला पॅरोल मंजूर करण्यात आला आहे.
यापूर्वी तुरुंग महानिरीक्षकांनी राजोआनाच्या पॅरोलचा अर्ज फेटाळला होता. यामुळे राजोआने उच्च न्यायालयात याचिका दाखल करत अंतरिम पॅरोल देण्याची मागणी केली होती. 28 वर्षे 9 महिन्यांपासून मी तुरुंगात असल्याचे त्याने स्वत:च्या अर्जात म्हटले होते. न्यायालयाने राजोआनाला 31 जुलै 2007 रोजी मृत्युदंड ठोठावला होता.
31 ऑगस्ट 1995 रोजी चंदीगड येथील पंजाब सचिवालयाबाहेर झालेल्या स्फोटात राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री बेअंत सिंह आणि अन्य 16 जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी बलवंत सिंह राजोआनाला विशेष न्यायालयाने मृत्युदंड ठोठावला आहे. राजोआनाचा मृत्युदंड सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवला आहे. तर दुसरीकडे राजोआनाने पुन्हा एकदा मृत्युदंड रद्द करणे आणि मुक्ततेसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राजोआना हा पंजाब पोलीस विभागात कार्यरत होता.