जंतर-मंतरवर तोडफोड करण्याचा दहशतवाद्याचा कट
बंगालमध्ये जैशचा दहशतवादी जेरबंद : पोलिसांचा गणवेश परिधान करून शिरण्याची तयारी : प्रेयसीलाही अटक
वर्धमान जिल्ह्यातून अटक करण्यात आलेला जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी हमीम मंडलने दिल्लीतील जंतर-मंतर येथील आंदोलनस्थळी तोडफोड करण्याचा कट रचला होता. हमीम हा कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात पोलिसांचा गणवेश परिधान करून शिरणार होता असा दावा पश्चिम बंगाल एसटीएफने केला आहे.
वृत्तसंस्था, कोलकाता
बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी समवेत अनेक नेते आणि पोलीस अधिकारी त्याच्या निशाण्यावर होते अशी माहिती एसटीएफचे महानिरीक्षक गौरव शर्मा यांनी दिली आहे. हमीम हा पाकिस्तानी हँडलर्सच्या संपर्कात होता, हँडलर्सच्या सुचनेवरूनच तो नेत्यांच्या हालचालींवर नजर ठेवणे आणि माहिती जमवत होता.
तपासात त्याचा मोबाइल फोन आणि सोशल मीडिया चॅटमधून व्हॉट्सअॅप, टेलिग्राम आणि इन्स्टाग्रामद्वारे पाकिस्तानी संपर्काचे पुरावे मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. एसटीएफने शुक्रवारी रात्री अर्पिता सरकार नावाच्या महिलेलाही अटक केली होती. अर्पिता ही मंडलची सहकारी आणि प्रेयसी असल्याचे सांगण्यात येत आहे.
हनिट्रॅपचा प्रयत्न
हमीम आणि त्याच्या प्रेयसीने मिळून बंगालच्या एका मंत्र्याच्या पुत्राला हनिट्रॅपमध्ये अडकविण्याचा कट रचला होता. या दोघांनी मंत्र्याच्या पुत्राचे अपहरण करणे आणि परिवाराकडून खंडणी उकळण्याचा कट रचला होता. हा कट पाकिस्तानच्या हँडलर्सच्या निर्देशानुसार रचण्यात आला होता असे चौकशीतून स्पष्ट झाले आहे. आम्ही या प्रकरणी प्रत्येक आरोपीची भूमिका आणि यात आणखी किती लोक सामील होते याचा तपास करत आहोत असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हालचालींवर नजर
23 वर्षीय हमीम हा हावडा येथे काम करत होता. बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी तो वर्धमान येथे स्थलांतरित झाला होता, जेथे त्याने अपार्टमेंट भाड्याने घेतले होते. तपास यंत्रणांच्या नजरेपासून वाचण्यासाठी तो मागील 2-3 महिन्यांपासून लपून बसला होता. हमीम एक वर्षापूर्वी सोशल मीडियाद्वारे दहशतवादी संघटनेच्या अशा मॉड्यूलशी जोडला गेला, ज्याला गँगस्टर शहजाद भट्टी आणि त्याचा सहकारी अजमल गुज्जर चालवत होते.
हमीमला पाकिस्तानी हँडलर्सनी मुख्यमंत्र्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्याचे काम सोपविले होते. मुख्यमंत्री सुरक्षेशिवाय कुठे राहू शकतात अशा ठिकाणांविषयी माहिती मिळविण्यास हमीमला सांगण्यात आले होते.
मंत्र्याच्या तक्रारीनंतर उलगडा
राज्याच्या मंत्र्याकडून खंडणी उकळणे आणि हनिट्रॅपचा वापर करत मंत्र्याच्या पुत्राचे अपहरण करण्याच्या कटाविषयी इनपूट मिळाल्यावर मॉड्यूलची चौकशी सुरु झाली होती. यामागे एका दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे चौकशीतून समोर आले. तसेच साहिबगंज येथील एका सोशल मीडिया हँडलबद्दल माहिती मिळाली, जे अर्पिता सरकार संचालित करत होती. सोशल मीडिया अकैंटच्या चौकशीतूनही मंडलविषयी एसटीएफला माहिती मिळू शकली.
बंगाल एसटीएफचे दावे....
?अर्पिता आणि हमीमने पाकिस्तानी हँडलर्सच्या सुचनेनुसार संवेदनशील माहिती मिळविण्यासाठी प्रभावी लोकांसोबत वैयक्तिक नाते निर्माण करण्याची योजना आखली होती.
?अर्पिता आणि हमीम मागील 4 वर्षांपासून संपर्कात होते आणि प्रथम त्यांची इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते परस्परांना प्रत्यक्ष स्वरुपातही भेटले होते.
?हमीम एन्क्रिप्टेड चॅट आणि विदेशी सिमकार्डचा वापर करून पाकिस्तानी हँडलर्सशी संपर्क साधत होता, त्यांचे कोडनेम राणा, अबीर, हबीब आणि 333 अशी होती.
?या दोन्ही आरोपींकडून युनायटेड किंगडम आणि मेक्सिकोमध्ये जारी आंतरराष्ट्रीय सिमकार्ड्स पोलिसांनी हस्तगत केली आहेत.