अमेरिकेत दहशतवादी कटाचा पर्दाफाश
वृत्तसंस्था / वाशिंग्टन डीसी
अमेरिकेत दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला गेल्याचे प्रतिपादन तेथील देशांतर्गत गुप्तचर संस्था एफबीआयने केला आहे. या प्रकरणी अमेरिकेच्या विविध भागांमधून अनेक जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून काही जणांना अटक करण्यात आली आहे. एफबीआयचे प्रमुख काश पटेल यांनी ही माहिती ‘एक्स’वरुन प्रसारित केली आहे. हा कट कोणाचा होता आणि तो कशा प्रकारचा होता, याची सविस्तर माहिती नंतर दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
हा कट उधळला गेला नसता, तर अमेरिकेत काही स्थानी मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला असता. तसेच अनेक नागरीकांचे प्राण धोक्यात आले असते. तथापि, एफबीआयच्या चाणक्ष गुप्तचरांनी या कटाची वेळीच माहिती काढल्याने तो उधळणे शक्य झाले आहे. या संबंधीची माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनही देण्यात आली आहे. अटक केलेल्यांची कसून चौकशी केली जात असून आतापर्यंतच्या तपासातून या कटाची पाळेमुळे अमेरिकेच्या अनेक प्रातांमध्ये पसरली असल्याची माहिती मिळाली असल्याचे प्रतिपादन त्यांनी त्यांच्या संदेशात केले.
डिअरबर्नमध्ये हल्ल्याची होती योजना
अमेरिकेच्या डिअरबर्न या शहरात मोठा हल्ला करण्याची ही योजना होती. तथापि, एफबीआयच्या गुप्तचरांना स्थानिकांशी चर्चा करता करता या कटाचा सुगावा लागला. त्यामुळे त्यांनी विनाविलंब कारवाई करत अनेक स्थानी धाडसत्रे चालविली. परिणामी, कट करणाऱ्यांना एका स्थानी जमणे अशक्य झाले. या कटाचे प्रमुख सूत्रधारही पकडण्यात आल्याने कट पूर्णत्वास नेणे दहशतवाद्यांना अशक्य झाले. या कटामागे कोणती इस्लामी दशहतवादी संघटना आहे काय, याची माहिती मात्र अद्याप देण्यात आलेली नाही. तथापि, दहशतवादी हल्ला करण्याचा हा कट होता हे निश्चित असल्याचे एफबीआय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे कटाचा सुगावा लागताच शुक्रवारी स्थानिक प्रमाणवेळेनुसार पहाटेपासूनच धाडी घालण्यास र्रारंभ करण्यात आला होता. आतापर्यंत किमान 40 संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येणार आहे. येत्या तीन ते चार दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होणार आहे. .