पीओके निवडणुकीत दहशतवाद्यांचा सहभाग
गिलगिट निवडणुकीला हायजॅक करण्याच्या तयारीत पाकिस्तान सैन्य
वृत्तसंस्था/ मुजफ्फराबाद
पाकिस्तानचे सैन्य गिलगिट-बाल्टिस्तानमध्य होणाऱ्या निवडणुकीत दहशतवादी हाफिज सईदच्या पाठिराख्यांना जिंकविण्यासाठी पूर्ण तयारी करत आहे. तेथे 7 जून रोजी निवडणूक होणार असून पाकिस्तानचे सैन्य अन्य पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार रोखत आहे. तसेच दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाशी संबंधित उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
लष्कर-ए-तोयबाशी संबंधित राजकीय संघटनेच्या उमेदवारांना निवडणुकीत सामील होण्यास पाकिस्तानचे सैन्य मदत करत असल्याचा आरोप स्थानिक नेत्यांनी केला आहे. पाकिस्तानच्या सैन्याने रणनीतिक स्वरुपात महत्त्वपूर्ण आणि शियाबहुल गिलगिट-बाल्टिस्तान क्षेत्रात पाकिस्तानच्या मरकजी मुस्लीम लीगच्या उमेदवारांना समर्थन दिले आहे. या पक्षाला एलईटी संस्थापक हाफिज सईदशी संबंधित राजकीय आघाडी मानण्यात येते.
पाकिस्तानी सैन्याचा डाव
-पाकिस्तानचे सैन्य दहशतवादी संघटनेच्या सदस्यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करत असल्याने स्थानिक राजकीय समुहांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
-पाकिस्तानी सैन्याचे हे पाऊल क्षेत्रातील राजकीय आणि वैचारिक परिस्थितीला नवे रुप देण्याच्या एका मोठ्या कटाचा हिस्सा असल्याचा स्थानिकांचा आरोप.
-गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये पीएमएमएलच्या उमेदवारांना मैदानात उतरविण्यात आल्याने सांप्रदायिक ध्रूवीकरण वाढण्याची शक्यता, शिया समुदाय चिंतेत.
-पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफसह अन्य विरोधी पक्षांनी पाकिस्तानच्या सैन्यावर प्रचार स्वातंत्र्य संपुष्टात आणल्याचा आरोप केला आहे.
-पीटीआय नेते, तहरीक तहफ्फुज-ए-आईन पाकिस्तान आघाडीच्या सदस्यांना इस्लामाबाद विमानतळावरच रोखण्यात आले, स्कार्दू दौऱ्यापासून रोखले.
शियाबहुल क्षेत्रावर संकट
पाकिस्तानचे सैन्यप्रमुख असीम मुनीर हे माजी सैन्यहुकुमशहा झिया उल हकच्या काळाची आठवण करून देणारी धोरणे पुन्हा लागू करत असल्याचा आरोप होत आहे. झियांनी पूर्ण पाकिस्तानात इस्लामिकरणाच्या धोरणांना बळ दिले होते. गिलगिट-बाल्टिस्तानच्या स्थानिक लोकांनी शियाबहुल या क्षेत्रात सुन्नी गटांना बळ देण्याच्या उद्देशाने या भागावर सैन्याची पकड मजबूत करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे.
पंजाब प्रांताच्या पोलिसांकडे जबाबदारी
निवडणूक प्रक्रियेत मोठी गडबड केली जात असून मतदार यादीत फेरफार करण्यात येत असल्याचा आरोप विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केला आहे. काही नेत्यांनी ‘फॉर्म-47 शैली‘च्या फेरफारचा इशारा दिला आहे. याचा अर्थ पाकिस्तानच्या 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीशी संबंधित असून त्यावेळी मतमोजणीदरम्यान निकाल बदलण्यात आल्याचा आरोप झाला होता. तर दुसरीकडे पंजाब प्रांताच्या पोलीस कर्मचाऱ्यांना गिलगिट-बाल्टिस्तानात तैनात करण्यात आल्याने या आरोपाला बळ मिळत आहे.