कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पंजाबमध्येही दहशतवादी मॉड्यूल उद्ध्वस्त

07:00 AM Nov 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आयएसआय, पाकिस्तानचा होता बॉम्बफेकीचा कट

Advertisement

वृत्तसंस्था/चंदीगढ

Advertisement

पंजाबच्या पोलिसांनी धडक कारवाई करून एका दहशतवादी मॉड्यूलचा भांडाफोड केला आहे. पाकिस्तान आणि त्याची कुख्यात गुप्तहेर संस्था आयएसआय यांनी पंजाबमध्ये आणि भारतात विविध स्थानी बॉम्बफेक करून घबराट माजविण्याचा केलेला कट या कारवाईमुळे अपयशी ठरला आहे. पंजाबमध्ये गर्दीच्या स्थानी आणि दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये बॉम्बस्फोट घडवून मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि रक्तपात घडविण्याचा हा प्रयत्न होता, अशी माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 10 संशयितांना अटक करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळपासूनच हाती घेण्यात आलेल्या या कारवाईत मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटके हस्तगत करण्यात आली आहेत.

300 किलो स्फोटके, मशिनगन्स आणि इतर घातक शस्त्रे, टायमर्स आणि स्फोटांसाठी उपयुक्त इलेक्ट्रॉनिक साधने जप्त करण्यात आली आहेत. या मॉड्यूलवर मलेशिया आणि पाकिस्तानातून नियंत्रण ठेवले जात होते. अटक केलेल्या 10 जणांच्या चौकशीत अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. हे सर्व हस्तक मलेशियातील त्यांच्या सूत्रधारांच्या माध्यमातून पाकिस्तानच्या आयएसआय या संघटनेच्या संपर्कात होते. हा कट वेळीच उघडकीस आल्याने मोठा अनर्थ टळला आहे, अशी माहिती पंजाब पोलिसांकडून देण्यात आली आहे. राज्यात सर्वत्र दक्षतेचा इशारा दिला गेला आहे.

अस्थिरता माजविण्याची योजना

1980 च्या दशकात पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला होता. तशा प्रकारची स्थिती या राज्यात पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न पाकिस्तान करीत आहे. यासाठी पंजाबमधील युवकांना हाताशी धरले जात असून त्यांच्या मनात धर्मांधतेचे विष कालविले जात आहे. त्यांच्या हस्ते राज्यात विविध स्थानी बॉम्बहल्ले करून राज्यात हिंसाचार आणि अस्थिरता निर्माण करण्याची जबाबदारी या मॉड्यूलवर सोपविण्यात आली होती, अशी माहिती पोलीसांकडून देण्यात आली आहे.

पंजाब पोलिसांचा निर्धार

राज्यात कोठेही हल्ला करण्याचा किंवा राज्यभर अस्थिरता आणि हिंसाचार माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक दुष्ट शक्तीचा विनाश केला जाईल, असा पंजाब पोलिसांचा निर्धार असल्याचे तेथील प्रमुख अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. राज्यातील वातावरण शांत आहे. ही शांतता भंग करण्याचा प्रयत्न दहशतवादी संघटनांकडून करण्यात येईल, हे गृहित धरुन त्यानुसार सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यात येत आहे. पंजाब पोलिसांनी दहशतवादाच्या विरोधात मोठे अभियान हाती घेतले असून त्यानुसार राज्यात विविध स्थानांवर धडक कारवाई करण्यात येत आहे. गुप्तचरांचेही या कामी मोलाचे सहकार्य आहे, असे स्पष्ट करण्यात आले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article