‘टीटीपी’साठी काम करणाऱ्या दहशतवादी हमराजला 7 वर्षांची शिक्षा
बेंगळूर एनआयए विशेष न्यायालयाचा आदेश : 63 हजारांचा दंड
त. भा. प्रतिनिधी
बेंगळूर :
बंदी असलेल्या तालिबान आणि तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी)च्या आंतरराष्ट्रीय सदस्यांच्या संपर्कात राहून या संघटनेसाठी तरुणांची भरती करणाऱ्या मूळच्या महाराष्ट्रातील महराज वोर्शिद शेख याला 7 वर्षांचा कारावास आणि 63 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. बेंगळूरमधील विशेष एनआयए न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली आहे.
एनआयएने आरोपी हमराज वोर्शिद शेख आणि मोहम्मद आरिफ यांच्या विरोधात राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) एप्रिल 2023 मध्ये युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. ऑक्टोबर 2023 मध्ये त्यांच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. बेंगळूरमधील एनआयए विशेष न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करून हमराजला 7 वर्षांचा कारावास आणि 63,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
2019 ते 2022 या काळात हमराज सौदी अरेबियात होता. पाकिस्तान आणि अफगानिस्तानमधील काही लोकांशी झालेल्या संपर्कातून तो तालिबान आणि टीटीपी या दहशतवादी संघटनांच्या विचारसरणीने प्रेरित झाला. तो दहशतवादी संघटनेच्या ‘हंझाला’ नावाच्या ऑनलाईन हँडलरच्या संपर्कात आल्याचे चौकशीतून समोर आले हेते.
हंझाला हा ‘काश्मीर पेज’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे तरुणांना भडकवून कट्टर विचार पेरत होता. भारतात परतल्यानंतर हमराजने मित्र व मोहम्मद आरिफ यांच्यासोबत तालिबान आणि टीटीपी या दहशतवादी संघटनांच्या विचारसरणीचा प्रसार करत होता. आर्थिक व इतर अडचणींचा सामना करणाऱ्या तरुणांना या संघटनेसाठी काम करण्यास प्रवृत्त करत होते. त्यांची या संघटनांत भरती केली जात होती. हमराज आणि मोहम्मद आरिफ हे दोघे भारताविरुद्ध ‘जिहाद वॉर’ करण्यासाठी टीटीपीत सामील होण्याच्या उद्देशाने स्वत:चा गट तयार करण्याच्या हालचाली करत होते, असे एनआयएने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.