दहशतवादी हाफिज सईद पाकिस्तानच्या तुरुंगात बंद
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईद पाकिस्तानच्या तुऊंगात 78 वर्षांची शिक्षा भोगत आहे. दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या सात प्रकरणांमध्ये दोषी ठरल्यानंतर पाकिस्तानच्या कैदेत असल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. गेल्या वषी डिसेंबरमध्ये भारताने पाकिस्तानकडे संयुक्त राष्ट्रांनी नियुक्त केलेला दहशतवादी सईदला त्याच्या हवाली करण्याची मागणी केली होती. त्यासाठी मुंबई हल्ल्यासह दहशतवादाशी संबंधित अनेक प्रकरणांमध्ये सईद भारतात हवा असल्याचे भारतीय अधिकाऱ्यांनी नमूद केले होते. भारतातील अनेक एजन्सींच्या वॉन्टेड यादीत सईदचा समावेश आहे. मात्र, पाकिस्तानने सईदला सोपवण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
डिसेंबर 2008 मध्ये सुरक्षा परिषदेच्या समितीने जागतिक दहशतवादी घोषित केलेला सईद पाकिस्तान सरकारच्या ताब्यात आहे. दहशतवादाशी संबंधित सात प्रकरणांमध्ये दोषी ठरल्यानंतर तो 78 वर्षांच्या तुऊंगवासाची शिक्षा भोगत आहे. हाफिज सईद पाकिस्तानात बसून केवळ भारतात दहशत पसरवत नाही, तर त्याने स्वत:चा राजकीय पक्ष स्थापन करून निवडणुकाही लढवल्या आहेत.