For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रशियात 3 ठिकाणी दहशतवादी हल्ले

06:39 AM Jun 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
रशियात 3 ठिकाणी दहशतवादी हल्ले
Advertisement

 15 पोलिसांसह 19 ठार : चर्च, ज्यू मंदिरासह पोलीस स्थानकाला दहशतवाद्यांनी केले लक्ष्य

Advertisement

वृत्तसंस्था/ मॉस्को

रशियातील दागेस्तानमधील दोन चर्च, एक सिनेगॉग (ज्यू मंदिर) आणि पोलीस चौकीवर दहशतवाद्यांनी रविवार, 23 जून रोजी हल्ला केला. या हल्ल्यात 15 पोलिसांसह एकूण 19 जणांचा मृत्यू झाला. तसेच 25 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या घटनेनंतर या भागात सोमवार, मंगळवार आणि बुधवार असे तीन दिवस दुखवटा घोषित करण्यात आला आहे.

Advertisement

वेगवेगळ्या भागात झालेले हे हल्ले सशस्त्र दहशतवादी इतिहास असलेल्या मुस्लीमबहुल भागात झाल्याचे रशियाच्या नॅशनल अँटी टेररिझम कमिटीने सांगितले. त्यांनी या हल्ल्यांचे वर्णन दहशतवादी कारवाया असे केले. तसेच या हल्ल्यांची योजना परदेशात शिजल्याचा दावा करण्यात आला आहे. हल्लेखोर आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचे सदस्य असल्याचे रशियाने म्हटले आहे. सध्या कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारलेली नाही. दागेस्तानच्या एका अधिकाऱ्याला त्याच्या मुलांचा हल्ल्यात सहभाग असल्याबद्दल ताब्यात घेण्यात आले आहे. या हल्ल्यादरम्यान झालेल्या चकमकीत 4 दहशतवादीही मारले गेले आहेत. काहीजण पळून गेले असून त्यांचा शोध सुरू आहे.

ज्यू मंदिर आणि चर्चवर हल्ले झाले ते दागेस्तानमधील डर्बेंट शहरात असून हा भाग मुस्लीमबहुल आहे. हा विभाग उत्तर काकेशसमधील ज्यू समुदायाचा गड आहे. तसेच हल्ला झालेले पोलीस स्थानक दागेस्तानची राजधानी मखाचकला येथे आहे. ते डर्बेंटपासून 125 किमी अंतरावर आहे. हल्ल्यादरम्यान दहशतवाद्यांनी एका चर्चच्या पादरींचा गळा चिरला. सदर पादरी 66 वर्षांचे होते.

हल्ल्यानंतर ज्यू मंदिराला आग

अल् जझीरा न्यूज नेटवर्कनुसार, दहशतवादी हल्ल्यामुळे डर्बेंटमधील एक सिनेगॉग आणि चर्चला आग लागली. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हल्ल्यानंतर हल्लेखोर कारमधून पळून जाताना दिसत आहेत. दहशतवाद्यांनी एका ज्यू मंदिरावरही गोळीबार केला. गोळीबारावेळी तेथे कमी लोक असल्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

यु क्रेन आणि नाटो देशांवर संशय

दागेस्तानने या हल्ल्यासाठी युक्रेन आणि नाटो देशांना जबाबदार धरले आहे. ‘हे दहशतवादी हल्ले कोणत्या ना कोणत्या प्रकारे युक्रेन आणि नाटो देशांच्या गुप्तचर सेवांशी संबंधित आहेत यात शंका नाही, असे दागेस्तानचे नेते अब्दुलखाकिम गदझियेव यांनी टेलिग्रामवर म्हटले आहे. रशियामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत युक्रेनकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

चालू वर्षातील दुसरा मोठा हल्ला

रशियातील दागेस्तानमधील हल्ला हा या वर्षातील दुसरा मोठा दहशतवादी हल्ला आहे. याआधी मार्चमध्ये झालेल्या हल्ल्यात 143 जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याची जबाबदारी ‘आयएसआयएस-के’ने स्वीकारली होती. मात्र, रशियाने यात युव्रेनवर हातमिळवणीचा आरोप केला होता. 18 मार्च रोजी पुतीन पाचव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर पाच दिवसांनी हा हल्ला झाला होता.

Advertisement
Tags :

.