कराचीमध्ये निमलष्करी दलाच्या मुख्यालयावर दहशतवादी हल्ला
चार सुरक्षा कर्मचाऱ्यांसह सहा दहशतवादी ठार : तालिबानशी संलग्न असलेल्या ‘जमात-उल-अहरार’ने स्वीकारली जबाबदारी
वृत्तसंस्था/ कराची
पाकिस्तानमधील कराची येथे शनिवारी रात्री सिंध रेंजर्सच्या निमलष्करी दलाच्या मुख्यालयावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. हा हल्ला रात्री 8:30 च्या सुमारास गुलिस्तान-ए-जोहर परिसरात झाला. यात चार रेंजर्स ठार झाले. तसेच सुरक्षा दलाने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात सहा दहशतवादीही ठार झाले. या संघर्षादरम्यान एका दहशतवाद्याला जखमी अवस्थेत अटक करण्यात आली. तालिबानशी संलग्न असलेल्या ‘जमात-उल-अहरार’ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
दहशतवाद्यांनी एका वाहनातून मुख्य दरवाजा तोडून आवारात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी हातबॉम्ब फेकले आणि गोळीबार सुरू केल्यामुळे अनेक स्फोट झाले. जवळपास दीड तास चाललेल्या चकमकीनंतर विशेष सुरक्षा पथक (एसएसयू), दहशतवादविरोधी दल (एटीएफ) आणि रेंजर्सने सर्व हल्लेखोरांना गतप्राण केले. सुरक्षा सूत्रांनुसार, हल्लेखोर बंदी घातलेल्या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या संघटनेचा एक गट असलेल्या ‘जमात-उल-अहरार’शी संबंधित होते. या संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ही संघटना अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या खैबर पख्तुनख्वामध्ये नागरिक, सुरक्षा कर्मचारी आणि सरकारी लक्ष्यांवर वारंवार हल्ले करत आहे.
परिसर सील, लोकांना घरातच थांबण्याचा सल्ला
निमलष्करी दलाच्या मुख्यालयावर झालेल्या या हल्ल्यानंतर संपूर्ण संकुल आणि आजूबाजूचा परिसर सील करण्यात आला. जवळचे रस्ते बंद करण्यात आले आणि लोकांना घरातच थांबण्याचा सल्ला देण्यात आला. या कारवाईदरम्यान जवळच्या काही भागांतील वीजपुरवठाही खंडित झाला होता. बचाव पथकेही घटनास्थळी पोहोचली. सिंधचे मुख्यमंत्री सय्यद मुराद अली शाह यांनी या घटनेचा अहवाल मागवला आहे. त्यांनी कराचीचे पोलीस महानिरीक्षक आणि अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक (एआयजी) यांना या प्रकरणाची संपूर्ण माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. गृहमंत्री झियाउल हसन लांजर यांनीही या घटनेचा स्वतंत्र अहवाल मागवला आहे.