बलुचिस्तानमध्ये बसवर दहशतवादी हल्ला, 6 ठार
25 हून अधिक जखमी; बलुच आर्मीने स्वीकारली जबाबदारी
वृत्तसंस्था/ स्लामाबाद
पाकिस्तानातील सर्वाधिक अशांत प्रांत असलेल्या बलुचिस्तान प्रांतातील तुर्बत भागात झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 25 हून अधिक जण जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींमध्ये बहुतांश सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. बलुच लिबरेशन आर्मी म्हणजेच ‘बीएलए’ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हा हल्ला बलुचिस्तानच्या धांग भागात झाला. आत्मघाती हल्लेखोराने प्रवासी बस आणि शेजारी उभ्या असलेल्या पोलिसांच्या वाहनाला लक्ष्य केले. हल्ल्यानंतर मोठा स्फोट झाल्याने परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
प्रवासी बसमध्ये प्रवास करणारे बहुतांश सुरक्षा कर्मचारी असल्याचे सांगण्यात येत आहे. स्फोटानंतर सुरक्षा दलाचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले होते. बचाव पथकाने जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल केले. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
हल्ल्यानंतर काही वेळाने बलुच लिबरेशन आर्मीने एक निवेदन जारी केले. या निवेदनात हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे. ‘बलुच लिबरेशन आर्मीच्या मजीद ब्रिगेड फिरदाईने (आत्मघाती बॉम्बर) पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला केला. या हल्ल्यात लष्कराचे अनेक जवान ठार झाले. आमची संघटना या हल्ल्याची जबाबदारी घेते’, असे सदर निवेदनात म्हटले आहे.
बीएलए संघटनेकडून सतत पोलीस आणि सुरक्षा जवानांवर हल्ले केले जात आहेत. बीएलएने यापूर्वीही अनेकदा हल्ले केले आहेत. पाकिस्तानच्या सुरक्षा दलांसाठी बलुचिस्तान हे सर्वात आव्हानात्मक क्षेत्र आहे. येथे सुरक्षा दल आणि फुटीरतावादी गटांमध्ये सतत रक्तरंजित संघर्ष सुरू असताना दिसतो.