आसामच्या तिनसुकियामध्ये सैन्यतळावर दहशतवादी हल्ला
तिनसुकिया:
आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील काकोपाथर क्षेत्रात शुक्रवारी सकाळी सैन्यतळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात तीन सैनिक जखमी झाले आहेत. सैन्य आणि पोलिसांनी दहशतवाद्यांना पकडण्यासाठी परिसरात शोधमोहीम हाती घेतल्याचे सैन्याधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. काही दहशतवाद्यांनी धावत्या वाहनातून काकोपाथर कंपनीच्या ठिकाणावर गोळीबार केला. सेवेवर तैनात सैनिकांनी या दहशतवाद्यांना त्वरित प्रत्युत्तर दिले, परंतु आसपासच्या घरांना नुकसानापासून वाचविण्यासाठी खबरदारी बाळगण्यात आली. प्रत्युत्तरादाखल कारवाईनंतर दहशतवादी स्वयंचलित शस्त्रांद्वारे गोळीबार करत घटनास्थळावरून पळाल्याचे सैन्याधिकाऱ्याने सांगितले आहे. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात तीन सैनिक किरकोळ जखमी झाले आहेत. परिसरात पोलिसांसोबत मिळून सैन्याने शोधमोहीम हाती घेतली आहे. हा भाग आसाम आणि अरुणाचल प्रदेशदरम्यान आंतरराज्य सीमेनजीक आहे.