पाकिस्तानात दहशतवादी हल्ला, 10 पोलीस ठार
टीटीपीने स्वीकारली जबाबदारी
वृत्तसंस्था/ डेरा इस्माइल खान
पाकिस्तानात पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी पोलिसांना लक्ष्य केले आहे. अफगाण सीमेनजीक शुक्रवारी 10 पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आली आहे. तर 7 अन्य जवान जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी)ने स्वीकारली आहे.
दहशतवाद्यांच्या एका मोठ्या समुहाने पोलीस चौकीवर हल्ला केला आणि फ्रंटियर कॉन्स्टेब्युलरी सुरक्षा दलाच्या सदस्यांची हत्या केली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. खैबर पख्तूनख्वा प्रांताचे मुख्यमंत्री अली अमीन खान गंडापुर यांनी या हल्ल्याची पुष्टी दिली आहे. हा हल्ला आमचा वरिष्ठ नेता उस्ताद कुरैशीच्या हत्येच्या सूडादाखल करण्यात आल्याचे टीटीपीने सांगितले आहे. अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या बाजौर जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्याने राबविलेल्या मोहिमेत कुरैशीचा मृत्यू झाला होता.
टीटीपी अफगाणिस्तानचा वापर आश्रयस्थळाच्या स्वरुपात करत आहे. तर अफगाणिस्तानातील तालिबान राजवटीने सीमेनजीक टीटीपीला सुरक्षित आश्रय पुरविला असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तानात टीटीपीने मागील काही काळात अनेक हल्ले घडवून आणले आहेत. टीटीपीने प्रामुख्याने पाकिस्तानी सुरक्षा दलांनाच लक्ष्य केले आहे. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात दहशतवाद्यांनी पोलिसांवर रॉकेटने हल्ला केला होता. या हल्ल्यात 11 पोलीस कर्मचारी मारले गेले होते.