जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, 10 भाविक ठार
वैष्णोदेवीला जात असलेल्या बसवर गोळीबार : अनेक जण जखमी
वृत्तसंस्था/ रियासी
नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळ्याच्या दिवशी म्हणजेच रविवारी जम्मूमध्ये दहशतवाद्यांनी माता वैष्णोदेवी दर्शनासाठी जा असलेल्या भाविकांच्या बसवर गोळीबार केला आहे. या दहशतवादी हल्ल्यात 10 भाविकांचा मृत्यू झाला आहे. हल्ल्याची माहिती कळताच सुरक्षा दलांनी तेथे धाव घेत मदत तसेच बचावकार्य हाती घेतले.
दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात बसचालकाच्या डोक्यात गोळी घुसल्याने बस अनियंत्रित होत दरीत कोसळली आहे. या दुर्घटनेत अनेक भाविक जखमी झाले असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांच्या शोधात सैन्य, सीआरपीएफ, जम्मू-काश्मीर पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली आहे.
हा दहशतवादी हल्ला जम्मू-काश्मीरच्या रियासी येथे घडला आहे. शिवखोडी मंदिरात दर्शन घेतल्यावर भाविक बसमधून माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी कटरा येथे जात होते. बस जंगलयुक्त भागात पोहोचताच घात लावून बसलेल्या दहशतवाद्यांनी बसच्या दिशेने गोळीबार सुरू केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी झालेल्या चालकाने नियंत्रण गमाविल्याने बस दरीत कोसळली.
बसमधून सुमारे 50 भाविक प्रवास करत होते. यातील 33 जण जखमी झाले आहेत. बचाव मोहीम पूर्ण झाली आहे. बसमधून प्रवास करणारे भाविक स्थानिक नव्हते. हल्ल्यानंतर शिवखोडी तीर्थस्थळावरील बंदोबस्त वाढविण्यात आल्याची माहिती रियासीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोहिता शर्मा यांनी सांगितले आहे. राजौरी, पुंछ आणि रियासीच्या पर्वतीय क्षेत्रात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी हा भ्याड हल्ला केला असल्याचे मानले जात आहे.