चाडमध्ये दहशतवादी हल्ला, 40 सैनिक ठार
वृत्तसंस्था/ डाकार
आफ्रिकन देश चाडमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी चाडमधील एका सैन्यतळाला लक्ष्य केले असून यात 40 सैनिकांना जीव गमवावा लागला आहे. मध्य आफ्रिकन देश असलेल्या चाडच्या शेजारी नायजर, नायजेरिया, सूदान आणि लीबिया हे देश आहेत. हा पूर्ण भाग दशकांपासून दहशतवादी हल्ल्यांना सामोरा जात आहे. चाडच्या अध्यक्षीय कार्यालयाने दहशतवादी हल्ल्याची माहिती दिली आहे. अध्यक्ष महामत इदरीस डेबी यांनी दहशतवाद्यांच्या विरोधात मोहीम राबविण्याचा आदेश दिला आहे.
चाडच्या बरकारम बेटावर हा हल्ला झाला आहे. हे बे नायजेरिया आणि नायजरच्या सीमेनजीक आहे. या दोन्ही देशांमध्ये इस्लामिक स्टेट आणि बोको हराम यासारख्या दहशतवादी संघटना सक्रीय आहेत. चाडमध्ये झालेला हल्ला बोको हरामने केल्याचे स्पष्ट झाले आहे.
बरकारम बेट हे लेक चाड क्षेत्रात असून तेथे इस्लामिक स्टेट इन वेस्ट आफ्रिका आणि बोको हरामने अनेक हल्ले केले आहेत. बोको हरामच्या कारवाया पूर्वोत्तर नायजेरियापासून चाडच्या पश्चिम क्षेत्रापर्यंत फैलावल्या आहेत. चाड हा फ्रान्स तसेच अमेरिकेचा महत्त्वाचा सहकारी आहे. या देशांसोबत मिळून चाह साहेल क्षेत्रात दहशतवाद्यांच्या विरोधात लढत आहे.