दहशतवाद : शून्य सहिष्णूतेचे सूत्र !
भारत आणि इस्रायल या देशांमधील मैत्री केवळ राजकीय नसून, ती सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक तसेच भू-राजनैतिक अशा विविध पातळीवर नवे वळण घेत आहे. नववर्षाच्या प्रारंभी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानेहू त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला आणि याप्रसंगी त्यांनी दहशतवादाच्या विरोधात समान भूमिकेवर भर दिला. जगात कुठेही असो, दहशतवादाच्या बाबतीत शून्य सहिष्णुता हे सूत्र घेऊन दोन्ही देशांनी आता दमदार वाटचाल सुरू केली आहे.
बदलत्या काळाच्या प्रवाहात दोन्ही देशांतील राजकीय संबंधांना नवी प्रगल्भता येत आहे. कारण अस्थिर आणि अनिश्चित अशा वातावरणातील जगामध्ये कोणतेही दोन देश जेव्हा समान हेतू व समान उद्दिष्टे समोर ठेवून एकत्र येतात, तेव्हा त्यांच्या मैत्रीला एक नवा संदर्भ प्राप्त होतो. भारताला पाकिस्तान व चीन या शेजारी देशांकडून सततचे धोके एखाद्या धक्क्यांप्रमाणे जाणवतात, तेव्हा या धोक्यांशी सामना करताना विश्वासार्ह आणि जबाबदार असा मित्र आवश्यक असतो. इस्रायलने भारताला प्रगतयुद्ध तंत्रज्ञान तसेच अद्ययावत गुप्तहेर यंत्रणा याबाबतीत सातत्याने सहाय्य केले आहे तसेच भारत कृषी, विकास, लघुउद्योग आणि शिक्षण व संशोधन या क्षेत्रांतसुद्धा दोन्ही देशांत अव्वल दर्जाचे आदान-प्रदान घडून येत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी इस्रायलच्या नेत्यांशी केलेली चर्चा ही खरोखरच नवे वळण देणारी ठरली आहे.
नवीन आशादायी चित्र
उभय देशातील मैत्रीमध्ये एक नवे आशादायी चित्र निर्माण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या दूरध्वनी संभाषणातून समोर आलेले काही प्रमुख मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. मैत्रीच्या सुगंधी फुलांना नवा बहर आला आहे. जणू या मैत्रीला वसंताची चाहूल लागली आहे. नववर्षाच्या प्रारंभी पहिल्याच आठवड्यात उभय नेत्यांनी दूरध्वनीवर केलेली ही चर्चा खरोखरच आशादायी चित्र निर्माण करणारी आहे. भारत आणि इस्रायलमध्ये धोरणात्मक भागीदारीच्या दृष्टीने आजवरच्या इतिहासाचा धांडोळा घेता असे दिसते की, वर्तमान काळ हा खरोखरच उत्कर्षाचा नवा बिंदू आहे. उभय देशांतील धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर आणि लोकशाही मूल्ये आणि तत्वे यावर विश्वासाने भर देण्यासाठी ही चर्चा फलदायी ठरली आहे.
संविधानावर आधारित लोकशाही आणि कायद्याचे राज्य यावर दोन्ही देशांचा प्रगाढ विश्वास आहे. त्यामुळे आशिया खंडातील सत्ता समतोलात दोन्ही देशांची भूमिका परस्परपूरक आणि तेवढीच विलक्षण हितवर्धक अशी राहिली आहे. दोन्ही देशांनी सामायिक प्राधान्ये ओळखली आहेत तसेच उभयतांनी समान लोकशाही मूल्ये, सखोल परस्पर विश्वास तसेच भविष्याकडे पाहण्याची तेजस्वी दृष्टी यावर आधारित नवी बांधणी करण्याचा संकल्प केला आहे.
सत्ता समतोलाचे मर्म
आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणत्याही दोन देशांचे संबंध हे परस्पर हितसंबंधांचे रक्षण करण्याच्या मूलभूत तत्त्वांवर आधारलेले असतात. परंतु, वर्तमान असमतोल, स्फोटक प्रादेशिक परिस्थिती आणि आर्थिक तसेच लष्करी क्षेत्रांतील घडामोडी यांमुळे दोन्ही देशांना परस्पर हितरक्षणासाठी समीप येणे अपरिहार्य बनले आहे. पंतप्रधान नेत्यानेहू यांनी गाझा शांतता योजनेच्या अंमलबजावणीबद्दल केलेल्या कामगिरी संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले. नेत्यानेहू यांनी त्यांना या शांती योजनेची माहिती दिली व त्यातील प्रगतीवर प्रकाश टाकला, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रदेशात न्याय आणि शाश्वत शांतता प्रस्थापित करण्यासाठी इस्रायलने घेतलेल्या भूमिकेचे समर्थन करून भारताचा त्यांना सबळ पाठिंबा घोषित केला. पश्चिम आशियातील वाढते तणाव, आखाती देशांमधील परस्पर स्पर्धा आणि डावपेच यामुळे परिस्थिती दोलायमान होत असताना इस्रायलच्या खंबीर भूमिकेमुळे शांतता प्रस्थापनेला एक नवी बैठक प्राप्त होत आहे. आशियाच्या राजकारणात भारत-इस्रायल मैत्री ही सत्ता संतुलनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आशियातील शांतता आणि स्थैर्य हाच विकासाचा खरा आधार आहे, हे लक्षात घेऊन दोन्ही नेत्यांनी आपल्या देशांतील जनतेला, लोकसमुदायाला शांती आणि समृद्धीच्या फलप्राप्तीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामागे शांतता हाच समृद्धीचा पाया आहे, हे सूत्र लपलेले आहे.
दहशतवाद विरोधात पवित्रा
संपूर्ण जगातील लोकशाहीला आज दहशतवादाचे खग्रास ग्रहण लागले आहे. एखाद्या राहू-केतू प्रमाणे पाकिस्तान-तुर्कस्तान यासारखे देश जगामध्ये अस्थिरता माजवत आहेत. खुद्द अमेरिका असो, रशिया असो की, इंग्लंड, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड अशा सर्व देशांमध्ये दहशतवादी कारवायांनी तेथील सामाजिक जीवनात अनेक बिकट प्रश्न निर्माण केले आहेत तसेच जगातील शाश्वत विकासालासुद्धा या दहशतवादाच्या संकटामुळे ग्रासले आहे. गेल्या वीस वर्षांत किमान जागतिक जीडीपीच्या विकासात तीन ते पाच टक्के घट या विनाशकारी दहशतवादी अपप्रवृत्तींमुळे झाली आहे. त्यामुळे दहशतवादाच्या विरोधात दोन्ही देशांनी समान पवित्रा घेतला आहे. जगाला त्रस्त करणाऱ्या दहशतवादाच्या विरोधात शून्य सहिष्णुता हे दोन्ही देशांचे समान धोरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बेंजामिन नेत्यानेहू यांनी शून्य सहिष्णुता देण्याच्या धोरणाच्या वचनबद्धतेचा पुन्हा एकदा जबरदस्त पुरस्कार केला आहे.
इस्रायलने हमास आक्रमणाशी शर्थीने झुंज दिली तसेच प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या देशाच्या कृषी, औद्योगिक व शैक्षणिक विकासाचा वेग मंदावू दिला नाही. त्यामुळे या देशातील नेतृत्वाचे तसेच लोकांच्या प्रतिकारशक्तीचे कौतुक केले पाहिजे. 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने मध्यरात्री केलेल्या आक्रमणामुळे गोंधळून न जाता इस्रायलने ज्या पद्धतीने दहशतवादाचा बिमोड केला, तो जगभर या देशाच्या पराक्रमाचा आणि सामर्थ्याचा लौकिक उंचावणारा ठरला.
इस्रायलच्या पहिल्या महिला पंतप्रधान गोल्डामीयर असे म्हणत असत की, इस्रायलचा जो काही भूप्रदेश इतर देशांनी लाटला आहे, तो परत मिळविणे आणि इस्रायलला अखंड देश बनवणे हे त्यांचे स्वप्न होते. आता नेत्यानेहू त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी निकराचा प्रयत्न करत आहेत. छळाकडून बळाकडे प्रवास केलेल्या इस्रायलची इतिहासाकडे बघण्याची दृष्टी खरोखरच विलक्षण आहे. त्यांनी माळरानावर नंदनवन फुलविले आहे आणि खडकाळ प्रदेशात हरितक्रांती घडवून आणली आहे.
लोकांच्या अखंड, अभंग आणि जिवंत देशभक्तीमुळे असाध्य ते साध्य होऊ शकते आणि राष्ट्र जगाच्या इतिहासात सोनेरी पान लिहू शकते, हे इस्रायलने सिद्ध केले आहे. त्यामुळे भारत आणि इस्रायल या दोन्ही देशांतील इतिहासाचा प्रवाह समसमान आहे. अनेक शतकांच्या आक्रमणांशी सामना करत भारताने आपले सत्व आणि स्वत्व टिकविले आहे. आज राष्ट्र बलशाली महासत्ता होण्याच्या दिशेने झेपावत आहे. अशावेळी भारतही दोन्ही देशांना नवी उंची गाठण्यासाठी प्रेरक ठरू शकते. इस्रायलने हमासच्या आक्रमणाविरुद्ध केलेला निकराचा संघर्ष असो, की भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात ऑपरेशन सिंदूरद्वारे आखलेली मोहीम असो. दोन्हींमध्ये एक समसमान सूत्र आहे ते असे की, दहशतवाद हा एक कर्करोग आहे. त्याची शस्त्रक्रिया योग्य वेळी केल्यास त्याचा नायनाट करता येतो. तथापि, प्रत्येक क्षणी प्रत्येक पावलावर सावध राहून पुढील संकटांशी सामना करणे, हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे.
समारोप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलच्या पंतप्रधानांशी दूरध्वनीवर केलेली चर्चा ही एक नव्या युगाची हाक आहे. विशेषत: जगात आर्थिक आणि सामाजिक दृष्टीने अनेक ताणतणावाचे प्रसंग उभे राहत आहेत. अशावेळी दोन्ही देशांनी दहशतवादाच्या विरोधात निश्चयाने उभे राहून लढण्याचा निर्धार केला आहे. हा निर्धार एक नवीन कलाटणी देणारा आहे. सध्याच्या डिजिटल युगात प्रत्यक्ष भेटीपेक्षाही दूरध्वनी आणि सोशल मीडियाद्वारे होणारा संपर्क हा सुद्धा परराष्ट्र धोरणात एक नवे उपांग म्हणून उदयास येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टेलिफोनिक डिप्लोमसीचे म्हणजे दूरध्वनीवर आधारित नव्या मुत्सद्देगिरीचे व कूटनीतीचे कौतुक केले पाहिजे. कारण अशा धोरणांमुळे श्रम आणि पैसा वाचतो आणि अपेक्षित संपर्क होऊन राष्ट्रे आपल्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी अधिक समीप येऊ शकतात. शिवाय हा जनसंपर्क मुक्त आणि खुला असतो. त्यामुळे भविष्यात कोणतेही संशय व शंकेचे ढग जमा न होता उभय राष्ट्रांत मैत्रीचे स्वच्छ, मुक्त आणि तेवढेच निर्भय वातावरण तयार होते, हेच या टेलिफोन मुत्सद्देगिरीचे आगळे-वेगळे वैशिष्ट्या होय.
नजीकच्या भविष्यकाळात दोन्ही नेत्यांनी लवकरच भेटण्याची शक्यता वर्तविली आहे आणि भविष्यात त्यांच्या भावी भेटीचे वेळापत्रकही ठरणार आहे तसेच नेत्यानेहू यांनी भारताच्या चाबहार या नियोजित बंदर विकासाच्या प्रकल्पात इस्रायल कोणतेही अडथळे निर्माण करणार नाही आणि प्रादेशिक कारवायांमुळे हा प्रकल्प प्रभावित होणार नाही, याची खात्रीही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली आहे. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी समाज माध्यमांवर या भेटीबद्दल आपले मत मांडताना सकारात्मक विचार प्रकट केले. नेत्यानेहू यांचा त्यांनी विश्वासू मित्र म्हणून उल्लेख केला आणि नजीकच्या भविष्यकाळात दोन्ही देशांतील द्विपक्षीय सहकार्याला सखोल प्रतिबद्धतेवर आधारित नव्या उंचीवर नेण्याचा संकल्पही प्रकट केला. त्यामुळे हे दूरध्वनी संभाषण खरोखरच उभय देशांतील परस्पर संबंधांना नवे वळण देणारे ठरू शकेल, यात शंका नाही.
प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर