विश्वशांतीचा सर्वात मोठा शत्रू दहशतवाद
परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
विश्वशांतीला सर्वात मोठा धोका जर कोणापासून असेल, तर तो दहशतवादापासून आहे. हाच वैश्विक शांतीचा सर्वात मोठा शत्रू आहे, असे प्रतिपादन भारताचे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी केले आहे. या धोक्याशी आपण सर्वांनी एकत्रितरित्या संघर्ष करण्याची आवश्यकता आहे. जे देश दहशतवादाला प्रोत्साहन, धनसाहाय्य, शस्त्रसाहाय्य आणि प्रशिक्षण देतात त्यांना एकटे पाडल्याशिवाय या समस्येवर तोडगा सापडणार नाही, अशी स्पष्टोक्तीही त्यांनी केली. ते बुधवारी एससीओच्या बैठकीत बोलत होते. एससीओची प्राथमिकता काय असली पाहिजे, याचे विवेचनही जयशंकर यांनी यावेळी केले.
कझाकस्तानची राजधानी अस्ताना येथे जयशंकर यांनी एका मुलाखतीतही हे विचार व्यक्त केले आहेत. जागतिक शांतीला धोका निर्माण करणाऱ्या तीन दानवांचा त्यांनी उल्लेख केला होता. दहशतवाद, फुटीरतावाद आणि उग्रवाद हे ते तीन दानव आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले होते. याच अस्ताना येथे शांघाय सहयोग संघटन (एससीओ) या संस्थेच्या बैठकीत त्यांनी या विचारांचा पुनरुच्चार केला आहे. आज दहशतवाद मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. अनेक मोठ्या आणि बलाढ्या देशांनाही हा धोका जाणवू लागला असून आता सर्वांनी एकत्र येऊन याच्याशी संघर्ष करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
क्षेत्रीय दहशतवादविरोधी संघटना
क्षेत्रीय दहशतवादविरोधी संघटनेचे महत्वही त्यांनी अधोरेखित केले. या संघटनेच्या साहाय्याने विश्व समुदाय निश्चितपणे दहशतवादाचा भस्मासूर गाडू शकतो. शांघाय सहयोग संघटनेनेही या संघटनेचे साहाय्य घेतल्यास ते लाभदायक ठरु शकेल. एससीओच्या परिषदेत दहशतवाद, उग्रवाद आणि फुटीरतावाद या विषयांवर चर्चा व्हावी, असा आग्रह भारताने धरला होता. त्यामुळे परिषदेत या विषयाचाही समावेश करण्यात आला, ही समाधानाची बाब आहे. दहशतवादाला पोसणाऱ्या देशांवर संयुक्तरित्या आणि कोणताही निमित्त न पुढे करता कठोर कारवाई केल्यास दहशतवाद नियंत्रणात येणे शक्य आहे. या विषयात कोणीही राजकारण आणता कामा नये. कारण, आज ना उद्या प्रत्येक देशाला या संकटाशी झुंजावे लागणारच आह, असा स्पष्ट इशाराही जयशंकर यांनी दिला आहे.
पाकिस्तानवर कटाक्ष
आपल्या भाषणात डॉ. जयशंकर यांनी पाकिस्तानवर कटाक्ष केला. दहशतवाद हे काही देशांचे धोरण आहे. त्यामुळे ते देश या धोरणाचे भरणपोषण करतात. याचा त्या देशांनाही नंतर तोटा होतो. पण आपल्या तोट्यापेक्षा शेजारी देशांना त्रास देण्यात त्यांना अधिक आनंद आहे. त्यामुळे अशा देशांवर विश्व समुदायाने जोरदार दबाव आणावयास हवा. त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करावयास हवी. त्याशिवाय दहशतवादाला वेसण घालता येणार नाही, अशी मांडणी त्यांनी केली.